प्रवासाची वेळही कामाच्या तासात मोजा

61% नोकरदार वर्गाची मागणी 

Updated: Dec 18, 2019, 04:58 PM IST
प्रवासाची वेळही कामाच्या तासात मोजा  title=

मुंबई : नोकरदार वर्गाचे दिवसभरातील आठ ते नऊ तास हे कामासाठी मोजले जातात. दररोज आपल्या कामावर जाण्यासाठी देशभरातील प्रत्येक व्यक्ती हा एक ते दोन तास प्रवास करतो. कुणी खासगी वाहनाने तर कुणी सार्वजनिक वाहनाने. आता आपल्या प्रवासाची वेळ देखील कामाच्या तासात मोजावेत अशी मागणी केली जात आहे. 

तुम्हाला ऑफिसमध्ये पोहोचायला किती वेळ लागतो? अर्धा तास? एक तास? की दोन तास? कारण हे तास तुमच्या कामाच्या आठ ते नऊ तासात मोजले जाऊ शकतात. IWG Global Workspace यांच्या सर्व्हेनुसार 61 टक्के लोकांनी त्यांच्या प्रवासाची वेळ ही कामाच्या तासात मोजण्याची मागणी केली आहे. 

तर 39 टक्के लोकांनी प्रवासाची वेळ हा देखील कामाचा भाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आणि हा प्रवास त्यांना करायला आवडत नसल्याचं देखील त्यांनी नमूद केलं आहे. जगभरातून 77 टक्के तर भारतातून 81 टक्के परदेशी कंपन्यांनी उच्च कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी कामाच्या वेळेत बदल केला आहे. यामुळे कामात लवचिकता निर्माण झाली आहे. तसेच एकाचवेळी प्रचंड गर्दी निर्माण होत नाही.

हा अभ्यास 80 देशातील 15 हजार व्यावसायिक लोकांच्या मानसिकतेवरून करण्यात आला आहे. यामध्ये कंपन्यांचे सिनिअर मॅनेजर आणि व्यावसायिकांचा समावेश आहे. मुंबई सारख्या शहरात ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी नोकरदार वर्गाला जवळपास तास, दोन तास प्रवास करावा लागतो. हा प्रवास नकोसा असला तरीही कामाचा भाग म्हणूनच तो केला जातो. यामुळे ही प्रवासाची वेळ कामाच्या तासात मोजण्याची मागणी केली जात आहे. मात्र तुमचा बॉस अथवा मॅनेजर 61टक्के मागणीकरणाऱ्यांमध्ये मोडतात का? हे पाहणं गरजेचं आहे.