Video: Swimming Pool मधली स्टंटबाजी जीवावर बेतली; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

Swimming Pool Stunt Viral Video: स्विमिंग पूलमध्ये घडलेला हा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हा मृत्यू लाईफगार्डच्या बेजबाबदारपणामुळे झाला आहे का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 21, 2024, 02:59 PM IST
Video: Swimming Pool मधली स्टंटबाजी जीवावर बेतली; घटनाक्रम CCTV मध्ये कैद title=
संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये झाला कैद

Swimming Pool Stunt Viral Video: मध्य प्रदेशमधील रतलाममध्ये एका विचित्र अपघातामध्ये तरुणाने प्राण गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथील डॉल्फिन स्विमिंग पूलमध्ये स्टंटबाजीच्या नादात 18 वर्षीय अनिकेत तिवारी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अन्य एका मुलाच्या चुकीमुळे कोणताही दोष नसताना अनिकेतचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर अनिकेतला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपाचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला. 

घटना सीसीटीव्हमध्ये कैद

डॉल्फिन स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या अनेक तरुणांमध्ये अनिकेतचाही समावेश होता. अनिकेत स्विमिंग पूलमधून बाहेर येत असतानाच दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एका तरुणाने पूलमध्ये डाइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याचा पाय अनिकेतच्या डोक्याला लागला. हा धक्का इतका जोरदार होता की अनिकेत बेशुद्ध होऊन थेट स्विमिंग पूलमध्ये पडला. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून सध्या व्हायरल झाला आहे. 

लाइफगार्डचा बेजबाबदारपणा

हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा लाइफगार्ड तिथेच उपस्थित होते. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती पाहता पोहणाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अनिकेत पाण्यात पडल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी कोणताही लाइफगार्ड पुढे आला नाही. उलट हे लाइफगार्ड स्विमिंग पूलच्या कठड्याजवळ फिरत आणि एकमेकांशी बोलत असल्याचं दिसून आलं आहे.

लाइफगार्ड नाही मित्र आधी मदतीसाठी धावले

सीसीटीव्हीमध्ये हा संपूर्ण घटनाक्रम रेकॉर्ड झाला असून एक तरुण स्विमिंग पूलपासून काही अंतरावरुन पळत येत डाइव्ह मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र यामध्ये त्याचा गुडघा अनिकेतच्या कपाळाजवळ लागतो आणि अनिकेत पाण्यात पडतो. आपला पाय कोणाला तरी लागल्याचं स्टंटबाजी करणाऱ्याला कळतं. तेव्हा तो पाण्यातून बाहेर येऊन नेमका कोणाला पाय लागला हे शोधण्याचा प्रयत्न करतो. मात्र तोपर्यंत अनिकेत पाण्यात पडलेला असल्याने त्याला समोर कोणीही दिसत नाही. दुसरीकडे लाइफगार्डऐवजी अनिकेतचे मित्रच त्याला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी आधी तो पडला त्या दिशेने धाव घेताना दिसतात.

यापूर्वीही इथे घडलाय असा प्रकार

डॉल्फिन स्विमिंग पूलमध्ये अशाप्रकारे तरुणाला प्राण गमवावा लागल्याची ही दुसरी घटना आहे. अनेकदा इशारा दिल्यानंतरही या स्विमिंग पूलविरुद्ध कारवाई होत असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी अनिकेतच्या मृत्यूनंतर हा स्विमिंग पूल सील केला असून सध्या या प्रकरणाचा तपास आहे.