नवी दिल्ली : राष्ट्रीय किसान महासंघानं आजपासून देशभरात १० दिवसांचं गाव बंद आंदोलन पुकारलंय. या १० दिवसात गावामधून शहरांमध्ये येणारी फळ, भाजीपाला आणि दूध यासारख्या जीवनावश्यक गोष्टींच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यताय.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची प्रमुख मागणी आहे. दीड पट हमीभावाच्या मागणीसाठी किसान संघटनांनी वर्षभरापूर्वी आंदोलन केलं. त्यात मध्यप्रदेशातील मंदसौरमध्ये पोलिसांच्या गोळीबारात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्याला येत्या ६ तारखेला एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्याविरोधात मंदसौरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
देशभरातल्या २२ राज्यांमध्ये किसान संघटनांनी संप पुकारलेला असला तरी त्याचं केंद्र मध्यप्रदेशात असणार आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि गुजरातमध्येही संपाचा प्रभाव बघायला मिळण्याची शक्यताय.