नवी दिल्ली : आपलं स्वत:चं आणि हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. घर खरेदी करण्याचं हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.
कमी उत्पन्न असलेले नागरिकही आपलं स्वत:चं घर खरेदी करु शकणार आहेत. हे घर खरेदी करण्यासाठी त्यांना केवळ दोन लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना दोन लाख रुपयांत वन बीएचकेचा फ्लॅट दिला जाणार आहे. आवास विकास परिषद आणि विकास प्राधिकरण हे गरजेनुसार बिल्डरांच्या सहाय्याने ही घरं बांधणार आहेत. कुठं आणि किती घर बांधण्यात येणार आहेत याची माहितीही समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप अंतर्गत एक लाख घरं बांधण्यात येणार आहेत. ज्यांची किंमत ४.५० लाख रुपये असणार आहे. यामध्ये केंद्र सरकार १.५० लाख रुपये आणि राज्य सरकार एक लाख रुपयांचं अनुदान देणार आहे. तर, घर खरेदी करणाऱ्याला दोन लाख रुपये द्यावे लागणार आहेत.
घर खरेदी करणाऱ्याला कर्ज उपलब्ध होणार आहे. या इमारती चार मजली असणार आहेत. प्रत्येक घरात दोन रुम, किचन, शौचालय, बाथरुम आणि बालकनी असणार आहे. या योजनेअंतर्गत कमीतकमी २५० घरं बांधण्यात येणार आहेत.