Viral : नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरमुक्ती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

कॅन्सरसारखा भयंकर आजार घरगुती उपायाने बरा होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात असा दावा केल्यानं याची पडताळी सुरु केली आणि यात काय सत्य समोर आलं आहे वाचा...

Updated: Jun 21, 2023, 09:21 PM IST
Viral : नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरमुक्ती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? title=

Viral Polkhol : नारळाचं गरम पाणी (Coconut Water) प्यायल्याने कॅन्सरसारखा (Cancer) भयंकर आजार बरा होऊ शकतो असा दावा करणारा एक मेसेज व्हायरल (Viral Message) होत आहे. रोज नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात आणि कॅन्सर होत नाही असा दावा करण्यात आला आहे. कॅन्सरसारखा भयंकर आजार गरम नारळाच्या पाण्याने बरा होऊ शकत असेल तर हा खूप मोठा उपाय आहे. पण, हा दावा केलाय त्यात तथ्य आहे का...? असं काय नारळाच्या गरम पाण्यात असतं, त्यामुळे कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात हे पाहणं गरजेचं आहे...त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल सुरू केली. 

व्हायरल मेसेज
नारळाचे गरम पाणी तुम्हाला आयुष्यभर कॅन्सरपासून वाचवू शकते. गरम नारळ  कॅन्सरच्या पेशी नष्ट करतो. एक कपमध्ये 2 ते 3 नारळाचे पातळ तुकडे करा, गरम पाणी घाला, ते पाणी क्षारयुक्त होईल, हे पाणी दररोज प्या, ते कोणासाठीही चांगले आहे. हा दावा केल्यानं आम्ही याची पोलखोल करण्यासाठी एक्सपर्टना भेटलो. त्यांना व्हायरल मेसेज दाखवून या दाव्यात तथ्य आहे का हे जाणून घेतलं. आमच्या पडताळणीत काय पोलखोल झालीय पाहुयात. 

व्हायरल पोलखोल
नारळाच्या गरम पाण्याने कॅन्सर बरा होतो हा दावा संपूर्णपणे खोटा (Fake Message) आहे. असे मेसेज वाचून घरी प्रयोग करू नका. घरगुती उपाय करण्याच्या नादात आजार अधिक बळावू शकतो

कॅन्सरसारखा आजार हा भयंकर आहे. तो वाढत गेला तर मृत्यूही ओढावू शकतो.त्यामुळे वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे. असे मेसेज पाहून विश्वास ठेवू नका. तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आमच्या पडताळणीत नारळाच्या गरम पाण्यामुळे कॅन्सर बरा होतो हा दावा असत्य ठरला.

कॅन्सर झाला म्हणजे मृत्यू होणार?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कॅन्सरबद्दल लोकांमध्ये पसरलेला समज खूप गंभीर आहे. कॅन्सरमुळे मृत्यूचा धोका हा आजाराच्या प्रकारावर आणि टप्प्यावर अवलंबून असतो. कॅन्सरचं निदान आणि उपचार याबाबत तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. लवकर निदान आणि उपचार केल्याने बहुतेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. 

कॅन्सर संसर्गजन्य आहे?
कॅन्सरच्या संक्रमणाबाबतही लोकांमध्ये अनेक संभ्रम आहे. बर्‍याचदा लोक कॅन्सरच्या रुग्णांना भेटण्यास किंवा त्यांच्या जवळ येण्यास संकोच करतात. पण कॅन्सर हा संसर्गजन्य आजार नाहीये. त्यामुळे कॅन्सर झालेल्या व्यक्तीला भेटल्याने कोणताही आजार पसरत नाही.