ओमायक्रॉनचा हा सब-व्हेरिएंट अधिक धोकादायक?

कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट जास्त धोका पसरवला नसला तरीही त्याच्या सब-व्हेरिएंटबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे.

Updated: Feb 2, 2022, 08:02 AM IST
ओमायक्रॉनचा हा सब-व्हेरिएंट अधिक धोकादायक? title=

मुंबई : गेल्या जवळपास 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढा देतोय. कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसतो तेव्हाच एक नवा व्हेरिएंट समोर येऊन चिंता वाढवतो. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट जास्त धोका पसरवला नसला तरीही त्याच्या BA.2 या सब-व्हेरिएंटबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. डेन्मार्कमध्ये केलेल्या अभ्यासातून असं आढळून आलंय की, BA.2 हे Omicron पेक्षा अधिक संक्रमण पसरवणारा आहे.

33 टक्के वेगाने पसरतो BA.2

कोपनहेगन युनिवर्सिटी आणि डॅनिश आरोग्य मंत्रालयाशी संबंधित शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील टीमने हा अभ्यास केला. या अभ्यासात असं आढळून आलंय की, ओमायक्रॉनचे नवा सब व्हेरिएंट BA.1 पेक्षा 33 टक्के वेगाने पसरतो. डेन्मार्कमधील BA.2 ची लागण झालेल्या लोकांद्वारे हा नवीन व्हेरिएंट वेगाने इतरांपर्यंत पसरतोय.

लसीकरणाचा प्रभाव कमी करतो व्हेरिएंट

संशोधकांनी सांगितलं की, अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, ओमायक्रॉन BA.2 हे नैसर्गिकरीत्या BA.1 पेक्षा अधिक वेगाने पसरतो. त्यात रोग प्रतिरोधक विरोधी गुणधर्म देखील आहेत, जे संक्रमणाविरूद्ध लसीकरणाची प्रभावीता कमी करतात. BA.2 वर लसीचा फारसा परिणाम होणार नाही. बूस्टर डोस घेतलेल्या व्यक्तींना देखील या व्हेरिएंटची लागण होऊ शकते.

व्हेरिएंटशी लढण्यास लस फायदेशीर

अभ्यासात असंही म्हटलंय की, लसीने कोरोना व्हायरसशी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीये. नवा सब-व्हेरिएंट लसीकरण झालेल्या आणि बूस्टर डोस घेणार्‍या कमी प्रमाणात पसरतो. डेन्मार्क व्यतिरिक्त अमेरिका, ब्रिटन, स्वीडन आणि नॉर्वेमध्येही BA.2 प्रकरणं आढळून आली आहेत.