सकाळी बेडवर लोळत राहायची सवय आहे का? तुम्हाला असू शकतात हे 5 गंभीर आजार

Struggling To Get Out Of The Bed You Might Have Dysania: तुम्हालाही सकाळी अंथरुणामध्ये लोळत रहावं वाटतं का? झोप पूर्ण झालेली असली तरी बेडवरुन उठायचा तुम्हालाही कंटाळा येतो का? असं असेल तर तुम्हाला आरोग्यासंदर्भातील काही गंभीर समस्या असू शकतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 7, 2023, 01:19 PM IST
सकाळी बेडवर लोळत राहायची सवय आहे का? तुम्हाला असू शकतात हे 5 गंभीर आजार title=
तुम्हालाही सकाळी झोपेतून उठायला त्रास जाणवतो का?

Dysania: डायसेनिया हा एक गंभीर मानसिक आजार आहे. या मानसिक आजारामध्ये सकाळी बेडवरुन उठावेसे वाटत नाही. सकाळी झोपेतून उठूच नये एवढीच समस्या या आजारामध्ये नसते. सकाळी झोपेतून उठण्याच्या वेळी पुरेशी झोप झालेली असतानाही अंथरुणामध्येच राहण्याची समस्याही या आजाराचाच एक भाग आहे. सतत पेंगल्यासारखं राहणं किंवा थकवा येणं या गोष्टीही डायसेनियामध्येच मोडतात.

डायसेनियाचे निदान वैद्यकीय चाचण्यांच्या माध्यमातून करता येत नाही. डायसेनियाची समस्या असल्यास संबंधित व्यक्तीला प्रकृतीसंबंधित इतरही गंभीर समस्या असण्याची शक्यता अधिक असते. डायसेनिया असलेल्यांना कोणत्या समस्या असू शकतात याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात...

हृदयरोग:

'जामा इंटर्नल मेडिसिन'मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की हृदयरोगाची समस्या असेल तर थकवा आणि सकाळी झोपेतून उठण्यास येणारा आळस असे संकेत दिसून येतात. धूम्रपान, जास्त वजन, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा उच्च कोलेस्टेरॉल यासारख्या गोष्टींमुळे हृदय किंवा फुफ्फुसाच्या आजाराचा धोका वाढू शकतो.

क्रॉनिक फॅटीग सिंड्रोम (CFS):

'सीएफएस'चे वैशिष्ट्य म्हणजे अचानक एखाद्या व्यक्तीला अत्यंत थकवा जाणवू लागतो. तसेच हा त्रास सुरु झाल्यानंतर तो कमीत कमी 6 महिने टिकतो. यामध्ये इतर कोणतंही लक्षण प्रामुख्याने दिसत नाही. शारीरिक किंवा मानसिक ताण घेतल्याने थकवा वाढू शकतो. मात्र या समस्येमध्ये कितीही विश्रांती घेतली तरी 'सीएफएस'ची लक्षणे कमी होत नाहीत.

झोपेचे विकार:

झोपेसंदर्भात सुमारे 80 विविध प्रकारचे  विकार आहेत असं 'नॅशनल सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अँड इंटिग्रेटिव्ह हेल्थ'ने म्हटलं आहे. यापैकी कोणताही झोपेचा विकार डायसेनियाला कारणीभूत ठरू शकतो. डायसेनियाचा त्रास असेल तर सकाळी ताजेतवाने आणि उत्साहात झोप पूर्ण करुन उठणे हे फार आव्हानात्मक होतं. 

नैराश्य:

डायसेनिया आणि नैराश्य या दोन्ही समस्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. नैराश्यामुळे झोपेच्या पद्धतींमध्ये म्हणजेच स्लिपींग सायकलमध्ये व्यत्यय येऊ शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे नैराश्याची लक्षणं अधिक प्राकर्षाने दिसून येतात. याव्यतिरिक्त, इतर वैद्यकीय परिस्थितींमुळे जाणवणारा थकवा देखील नैराश्यास कारणीभूत ठरू शकतो.

थायरॉईडसंदर्भातील विकार:

अधिक थकवा जाणवणे हा हायपोथायरॉईडीझम किंवा हाशिमोटो या सारख्या थायरॉईड विकारांशी संबंधित असू शकतो. यावर उपचार न केल्यास असा थकवा अनेक महिने किंवा वर्षेही टिकू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)