डायरियावर सोपे घरगुती उपाय

जाणून घ्या काही सोपे उपाय...

Updated: Jul 18, 2019, 07:38 PM IST
डायरियावर सोपे घरगुती उपाय title=

मुंबई : पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. पावसाच्या दिवसांत साथीचे आजार मोठ्या प्रमाणात बळावतात. दुषित पाणी पिण्यामुळे डायरिया होण्याचा धोका असतो. डायरिया लवकर बराही होतो. मात्र जर काही दिवसांत तो बरा झाला नाही तर ही चिंतेची बाब आहे. डायरियामध्ये जुलाब आणि उलट्या होतात. त्यामुळे शरीरातील पाणी मोठ्या प्रमाणात निघून जाते आणि शरीरात डिहायड्रेटेशन होते. काही वेळेला पोटात इन्फेक्शन झाल्यास त्रास अधिक वाढू शकतो. त्यामुळे डायरियावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. डायरिया झाल्यास काही घरगुती उपायांनीही आराम मिळतो.

साखर आणि मीठाचे पाणी 

डायरिया झाल्यास शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळे १-२ तासांच्या अंतराने मीठ आणि साखरेचं पाणी घेतल्यास फायदा होतो. यामुळे शरीरातील पाण्याची कमी भरुन निघते, तसंच अशक्तपणाही काही प्रमाणात कमी होतो.

ओआरएस

डायरियामुळे जुलाब झाल्यास ओआरएसच्या सेवनाने चांगलाच फायदा होतो. ओआरएस शरीरातील खनिज आणि पाण्याची कमी भरुन काढतो. त्यामुळे अनेकदा डॉक्टरही जुलाब झाल्यास ओआरएस पिण्याचा सल्ला देतात.

केळे आणि सफरचंद 

केळं आणि सफरचंद खाण्याने डायरियामध्ये आराम मिळतो. सफरचंद आणि केळ्यातील पेक्टिन अतिसार कमी करण्यास मदत करतो.

दूधाचे पदार्थ

डायरिया झाल्यास दूध किंवा दूधाचे कोणतेही पदार्थ खाणे टाळावे. हे पदार्थ सहजपणे पचत नाही. त्यामुळे समस्या अधिक वाढू शकते. 

हलक्या पदार्थांचे सेवन

डायरियामध्ये जेवण, खाणं पूर्णपणे बंद करु नये. त्यामुळे अधिक अशक्तपणा येतो. थोड्या-थोड्या वेळाच्या अंतराने हलके आणि लवकर पचणाऱ्या पदार्थांचे सेवन करणं गरजेचं आहे. डायरियामध्ये मूगाची डाळ, दलिया, मूगाची खिचडी अशा पदार्थांचे सेवन करावं. अतिसार झाल्यास जेवणात मसालेदार पदार्थांचा समावेश करु नये. अल्कोहोलही घेऊ नये.

नारळपाणी 

डायरियामुळे अतिसार झाल्यास शरीरातील पाण्यासोबतच आवश्यक पोषक तत्त्वही कमी होतात. त्यामुळे अशक्तपणा येतो. नारळपाण्यामुळे शरीरात आवश्यक ते मिनरल्स मिळतात आणि पाण्याची कमतरताही भरुन निघते.