SEX चा बाऊ नको... पालकांनो मुलांसोबत खुलेपणानं चर्चा करा!

सेक्स... चारचौघांत हा शब्द जरी उच्चारला तरी एखादं पाप केल्यासारखे लोकांचे चेहरे होतात

Updated: Dec 6, 2018, 02:29 PM IST
SEX चा बाऊ नको... पालकांनो मुलांसोबत खुलेपणानं चर्चा करा!  title=

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : पालकांनो, तुमच्या मुलांशी कुठल्याही विषयावर बोलायचं टाळू नका... कारण तुम्ही जरी टाळलंत, तरी त्यांना हवं असलेलं ज्ञान झटपट देणारे सोशल मीडियावर अनेक गुरू उपलब्ध आहेत... त्यांच्या नादी लागून मुलांमधले मानसिक आजार वाढताना दिसत आहेत. म्हणूनच एक महत्त्वाचा इशारा डॉक्टरांनी दिलाय. 

सेक्स... चारचौघांत हा शब्द जरी उच्चारला तरी एखादं पाप केल्यासारखे लोकांचे चेहरे होतात... आजही शाळांमध्ये लैंगिक शिक्षण हा विषय नाही... या विषयावर खुलेपणानं बोलायचं नाही, असा एक अप्रत्यक्ष दंडकच भारतामध्ये घातलेला आहे. पण आता त्याचे दुष्परिणाम दिसायला लागलेत. जमाना सोशल मीडियाचा आहे आणि नवी पिढी स्मार्टफोन सॅव्ही आहे... त्यामुळे कुठल्याही विषयाबद्दल योग्य मार्गदर्शन मिळालं नाही की कुतूहल शमवण्यासाठी पौगंडावस्थेतल्या मुलांसाठी सर्रास गुगल किंवा युट्यूबवर सर्च विंडो ओपन होते... आणि आता त्याचे भयानक परिणाम समोर येताना दिसत आहेत, असं निरीक्षण ठाणे मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय बोधडे यांनी नोंदवलंय.

नवी पिढी लवकर वयात येतेय... त्यांना शारीरिक आणि मानसिक बदलांबद्दल कुतूहल असतं... ते शमलं नाही की सर्रास पॉर्न साईटसचा आधार घेतला जातोय... आणि मग अति पॉर्नच्या आहारी गेल्यानं अनेक मानसिक रोगही उद्भवत आहेत.

मुळात सध्या पालकांना मुलांशी बोलायलाच वेळ नाही, त्यात सेक्स संदर्भात पालक मुलांशी खुलेपणानं बोलत नाहीत... मग चुकीची माहिती मिळाल्यानं मुलं मनोरुग्ण होण्याची शक्यता आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. 

शाळेत लैंगिक शिक्षणाची गरज असल्याचा मुद्दा पुन्हा प्रकर्षानं समोर येतोय... त्यावरही विचार व्हायला हवा... त्याआधी पालकांनो, सगळ्या विषयांवर मुलांशी खुलेपणानं संवाद साधायला सुरुवात करा... मुलाचे आई-बाबा आहातच, मित्र होण्याचा प्रयत्न करा...