मुंबई : व्यस्त जीवनशैली, जंक फूड खाण्याची सवय, झोपण्याच्या विचित्र वेळा या सार्यामुळे आजकाल लाईफस्टाईलशी निगडीत अनेक समस्या वाढायला सुरूवात झाली आहे.
संतुलित आणि पोषक आहाराच्या अभावामुळे आजकाल वाढणारी एक समस्या म्हणजे मूळव्याध. मूळव्याधीचा त्रास हा वेदनादायी असतो. सोबतच या आजाराबाबत फारसे खुलेपणाने बोलताही येत नसल्याने अनेकजण मूळव्याधीचा त्रास सहन करतात. परिणामी मूळव्याध गंभीर टप्प्यावर आल्यानंतर शस्त्रक्रियेचा पर्याय आजामावा लागतो.
व्यस्त जीवनशैलीप्रमाणेच, गरोदरपणा, लठ्ठपणा, वाढतं वय, बद्धकोष्ठता यामुळे मूळव्याधीची समस्या वाढते. मूळव्याधीचा त्रास वेळीच लक्षात आल्यास काही नैसर्गिक उपायांनी त्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. अशापैकी एक म्हणजे केळ.
बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी केळ फायदेशीर ठरते. केळ्याच्या सेवनामुळे बद्धकोष्ठतेप्रमाणेच मूळव्याधीच्या समस्येमध्ये मलविसर्जनाच्या वेळेस होणारा त्रास, रक्त पडण्याची समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते.
पिकलेलं केळ रात्रीच्या वेळेस खाणं आरोग्यदायी आहे. आहारातही फायबर्सयुक्त पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर आहे. आहारात फायबर्सयुक्त पदार्थांचा समावेश केल्याने पचन सुकर होणं फायदेशीर ठरते. आहारात 'या' भाजीचा समावेश कराल तर दूर होईल 'मूळव्याधी'ची समस्या !
मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी केळं फायदेशीर आहे. मात्र कच्च केळं खाऊ नका. कच्च्या केळ्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास अधिक त्रासदायक होऊ शकतो. परिणामी मूळव्याधीचा त्रासही अधिक गंभीर होऊ शकतो.
पिकलेल्या केळ्यामध्ये tannins आणि amylase-resistant हे घटक कमी झालेले असतात. त्यामुळे सोल्युबल फायबर्सचं प्रमाण वाढतं. त्यामुळे पूर्ण पिकलेलं केळ मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. केळ्याप्रमाणेच जिरं - मूळव्याधीच्या समस्येवरील घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतं.