श्रीरामाने वनवासात खाल्लेले कंदमुळं म्हणून विकले जाणारे काप म्हणजे नेमकं काय?

Ram Kand Mool: प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवासात असताना त्यांनी एक कंदमुळं खाल्लं होतं. ते आजही रामकंद म्हणून विकले जाते. पण हे खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? जाणून घ्या 

Updated: Jan 22, 2024, 01:24 PM IST
श्रीरामाने वनवासात खाल्लेले कंदमुळं म्हणून विकले जाणारे काप म्हणजे नेमकं काय? title=
am mandir pran pratishtha Ram Kand Mool Does Have Any Health Benefits

Ram Kand Mool: प्रभू श्रीराम यांनी 14 वर्षे वनवास भोगला. वनवासात असताना एका छोट्याशा पर्णकुटीत ते बंधू लक्ष्मण आणि जानकीसोबत राहत होते. 14 वर्षांच्या वनवासात प्रभू श्रीराम भारतातील अनेक ठिकाणी वास्तव्यास होते. वनवासात असताना प्रभू श्रीराम व सीता माता एक कंदमुळं खात असतं. आज त्या कंदमुळंला रामकंद म्हणून ओळखले जाते. अनेक ठिकाणी, गावागावात हे रामकंद विकले जाते. पण तुम्हाला माहितीये का हे रामकंद कुठून येते आणि ते आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घेऊया. 

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात रामकंद म्हणून काहीजण कंदमुळं विक्री करताना दिसतात. प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवासात होते तेव्हा ते हे कंदमुळ खात असत, असा दावा केला जातो. तसंच, चवीला गोड आणि आंबट असणारे हे रामकंद आरोग्यासाठी लाभदायक असल्याचाही दावा केला जातो. पण खरंच हे कंदमुळं रामकंद आहे का, हे आम्ही जाणून घेतले. सोशल मीडिया साइट कोरावर लिहलेल्या एका पोस्टनुसार, या रामकंदाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, काही संशोधकांनी या कंदमुळाचा अभ्यास केला तेव्हा या वनस्पतीचे नाव अगेव्ह सिसालाना किंवा अगेव्ह अमेरिकाना असं आहे. अनेकजण मोठ्या आवडीने हे कंद विकत घेऊन खातात. चवीला गोडसर असल्याचे सांगून अनेकजण त्याची विक्री करतात. मात्र मुळात हे कंदमुळं नसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळं कुठेही हे दिसले तरी ते न खाण्याचा सल्ला दिला जातो. 

रामकंद हे कंदमुळं नसून ते घायपात किंवा अनेक ठिकाणी त्याला केकताड म्हणून ओळखले जाते. या वनस्पतीची पाने काढून टाकली जातात व त्यावर रंदा मारुन गुळगुळीत केले जाते. तसंच ते कंदमुळं वाटावे यासाठी लाल रंग किंवा मातीचा थर दिला जातो. मात्र प्रत्यक्षात हा खोडाचा भाग आहे. 

रामकंद म्हणून विकले जाणारे हे कंदमुळं चवीला गोड लागते कारण त्यावर साखरेचे पाणी टाकण्यात येते. हे पाणी मुरले की त्याचे छोटे छोटे काप करुन ते विकले जाते. आरोग्यासाठीही हे काप धोकादायक असल्याचे सांगण्यात येते. कारण या कंदात व्हीकोजेनीन नावाचे स्ट्युराईड आहे. त्यामुळे ते अति प्रमाणात खाल्ल्यास ते आरोग्यास घातक ठरू शकते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)