मुंबई : प्रत्येक घरात डासांची मोठी समस्या असते. ज्यांच्या घरात डास नाही असं घर क्वचितच सापडेल. डासांच्या समस्यांनी अनेक कुटुंब हैराण झालेली असतात. घराच्या बाहेरही डासांचा वावर असतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारखे जीवघेणे आजार बळावण्याचं प्रमाणही वाढलं आहे. डास घालवण्यासाठी अनेक घरांत मच्छर अगरबत्ती, डास घालवण्यासाठीचं लिक्विड वापरलं जातं. परंतु या केमिकलयुक्त उपायांमुळे शरीराला मोठं नुकसान होत असतं. नकळतपणे श्वासामार्फत शरीरात जाणारा मच्छर अगरबत्तीचा केमिकलयुक्त धूर किंवा लिक्विड शरीराला कालांतराने मोठी हानी पोहचवत असतं. त्यामुळे डास घालवण्यासाठी अशा केमिकलयुक्त पर्यांयापेक्षा घरगुती आणि सुरक्षित उपायांचा वापर फायदेशीर ठरतो. या घरगुती उपायांमुळे आरोग्याला कोणतीही हानी होत नसून डासांची समस्या घालवण्यासही मदत होते.
डास घालवण्यासाठीचा सर्वांत सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे कापूर. कापराच्या काही वड्या जाळा. कापूर जाळल्यानतंर घराची खिडक्या, दारे १० मिनिटांसाठी बंद करुन घ्या. यामुळे डास पळून जातील. तसंच कापूर आणि लवंग एका सुती कपड्यात बांधून घरातील एखाद्या कोपऱ्यात बांधून ठेवा त्यामुळेही डास पळून जातात.
लसूनही डास पळवण्यासाठी फायदेशीर ठरतो. लसणाचा रस शरीरावर लावल्याने किंवा शिंपडल्यानेही डासांची समस्या कमी होते. डास घालवण्यासाठी लवेंडर फुलाचा चांगला फायदा होतो. लवेंडर फुलाचा सुगंध डास पळवून लावतो. संपूर्ण घरात लवेंडर फुलाचं तेल शिंपडल्यास डास जाण्यास मदत होते.
राईच्या तेलात ओव्याची पावडर मिसळून त्याचे तुकडे तयार करा. हे तुकडे घरातील सर्व कोपऱ्यांमधून एखाद्या उंच जागेवर ठेवा. हा उपाय केल्याने डास नाहीसे होतात. कडूलिंबाच्या पानांचाही डासांपासून बचाव करण्यासाठी फायदा होतो. कडूलिंब आणि नारळाचं तेल समान प्रमाणात एकत्र करुन ते मिश्रण शरीरावर लावल्याने डास जवळ येत नाहीत. याचा परिणाम सलग ८ तासांपर्यंत राहतो.