Mosquitoes To Replace Dengue And Chikungunya: पावसाळ्यात साथीच्या आजारांचं प्रमाण वाढतं. डेंग्यु, चिकनगुनिया हे आजार थैमान घालतात. पावसाचं पाणी ठिकठिकाणी साठल्याने डेंग्यूच्या डासांची वाढ होते. हे डास चावले की डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे आजार होतात. यासाठी नागरिक विविध उपाययोजना करतात. स्वच्छतेसोबत पाणी साचू नये यासाठी नागरिक प्रयत्न करतात. आयसीएमआरला डासांमुळे होणाऱ्या डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या आजारांपासून मुक्ती मिळवण्याच्या दिशेने मोठे यश मिळाले आहे. यावर तज्ज्ञांनी एक प्रभावी उपाय शोधला आहे. आता डासच लोकांना डेंग्यूच्या डासांपासून वाचवतील. यासाठी खास डासांची निर्मिती करण्यात आली असून, त्यामुळे डेंग्यूच्या डासांचा प्रभाव कमी होणार आहे.
इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने विशेष प्रकारच्या मादी डासांची निर्मिती केली आहे. यामुळे डेंग्यूच्या डासांच्या प्रभाव कमी होईल. या संदर्भात आयसीएमआर-व्हीसीआरसीचे संचालक डॉ. अश्विनी कुमार यांनी एएनआयला सांगितलं की, विशेष मादी डास डेंग्यू आणि चिकनगुनियाचा नायनाट करण्यास सक्षम आहेत.
#WATCH | Puducherry| Prepared mosquitoes to replace Dengue & Chikungunya mosquitoes. Will release female ones which will mate with males&produce larvae who don't have these viruses. We've prepared mosquitoes&eggs & can release them anytime: Dr Ashwani Kumar Director ICMR-VCRC pic.twitter.com/zKx7Yb3s1Y
— ANI (@ANI) July 6, 2022
डॉ. अश्विनी कुमार म्हणाले की, हे खरं तर एंडोसिम्बियंट आहे. एंडो म्हणजे आतील संबंध आणि बियोंट म्हणजे देणे आणि घेणे. हे डासांच्या प्रत्येक पेशीमध्ये आपले घर बनवते आणि नंतर सर्व वोल्बॅचिया डेंग्यू सारख्या विषाणूंवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवू शकतात. संशोधनात असे आढळून आले आहे की, एडिस इजिप्ती डासांना वोल्बॅचिया बॅक्टेरियाची लागण झाली असेल तर ते डेंग्यू पसरवण्यास सक्षम राहात नाहीत.