रक्तदान करुन 'या' एका आजोबांनी दिलं 24 लाख बाळांना जीवनदान! त्याचं रक्त फारच खास कारण...

The Man Who Saved The Lives Of 24 lakh Babies: रक्तदान केल्याने आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल मात्र एका आजोबांनी रक्तदानाच्या माध्मयातून 24 लाख बाळांना जीवनदान दिलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 29, 2023, 06:07 PM IST
रक्तदान करुन 'या' एका आजोबांनी दिलं 24 लाख बाळांना जीवनदान! त्याचं रक्त फारच खास कारण... title=
मागील 60 वर्षांपासून करत आहेत रक्तदान (फोटो - रॉयटर्सवरुन साभार)

The Man Who Saved The Lives Of 24 lakh Babies: रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे असं म्हटलं जातं. आपल्यापैकी अनेकजण रक्तदानाला गेले असता किंवा त्यासंदर्भातील जनजागृतीच्या जाहिरातींमध्ये अनेकदा हे वाक्य वाचलं असेल. असं असलं तरी रक्तदानासंदर्भात लोक फारसे जागृक नाहीत. अनेकदा रक्त वेळेत न मिळाल्याने अगदी रुग्ण दगावल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. मात्र जगात एक अशी व्यक्ती आहे जी नियमितपणे रक्तदान करते आणि त्याचा फायदा काही शे किंवा हजार नाही तर लाखो चिमुकल्यांना झाला आहे. लाखो बाळांचे प्राण वाचवणाऱ्या या वयक्तीचं नाव आहे जेम्स हॅरिसन. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या या आजोबांनी मागील 60 वर्षांमध्ये असंख्य वेळा रक्तदान करुन तब्बल 24 लाख मुलांचे प्राण वाचवले आहेत. त्यांना 'मॅन वीथ द गोल्डन आर्म' नावानेही ओळखलं जातं.

ते स्पेशल केस आहेत

हॅरिसन हे सध्या 81 वर्षांचे आहेत. ते वयाच्या 21 व्या वर्षापासून नियमितपणे रक्तदान करता. त्यांनी याच आठवड्यात बुधवारी रक्तदान केलं आहे. वैद्यकीय नियमानुसार 81 वर्षीय व्यक्तीला रक्तदान करता येत नाही. मात्र हॅरिसन हे स्पेशल केस आहेत. खरं तर त्यांच्या या स्पेशल असण्याची गोष्ट त्यांच्या वयाच्या 14 व्या वर्षापासून सुरु होती. हॅरिसन यांच्या छातीची शस्त्रक्रीया झाली होती. त्यावेळी रक्तदाता मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले होते. त्यामुळेच आपण एक आदर्श रक्तदाता व्हायचं असं ठरवलं होतं.

1100 हून अधिक वेळा रक्तदान

हॅरिसन यांनी ऑस्ट्रेलिया रेड क्रॉसमध्ये 1100 हून अधिक वेळा रक्तदान केलं आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार हॅरिसन यांचं रक्त हे सर्वसामान्य व्यक्तीच्या रक्तासारखं नाही. हॅरिसन यांच्या रक्तामध्ये एक दुर्मिळ अ‍ॅण्टीबॉडीज आहेत. या अ‍ॅण्टीबॉडीज रीसस नावाच्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी फार फायद्याच्या आहेत. रीसस निगेटीव्ह असलेली गर्भवती महिला रीसस-पॉझिटीव्ह मुलाला जन्म देते तेव्हा त्याचा परिणाम त्या चिमुकल्यावर होतो. अशा बालकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अ‍ॅण्टीबॉडीज तयार करतात. मात्र या अ‍ॅण्टीबॉडीज या बालकांच्या रक्तवाहिन्यांवरच हल्ला करतात. यामुळे बालकांच्या मेंदूला कायमची इजा होण्याची शक्यता असते. गुंतागुंत वाढत गेल्यास बाळाचा मृत्यूही होऊ शकतो.

30 लाखांहून अधिक डोस

हॅरिसन यांचं रक्त या समस्येवर रामबाण उपाय ठरलं. त्यांच्या रक्तामध्ये असलेल्या अ‍ॅण्टीबॉजीचा फायदा अ‍ॅटी-डी नावाचं इंजेक्शन तयार करण्यासाठी झाला. खरं तर हा शोध आरोग्य क्षेत्रातील चमत्कारच होता. रीससविरुद्ध लढण्यासाठी या इंजेक्शनच्या माध्यमातून एक उत्तम शस्त्र डॉक्टरांना सांपडलं. हॅरिसन यांनी केलेल्या या सहकार्याचा फायदा 20 लाखांहून अधिक महिलांना झाला. 1967 मध्ये नाकारात्मक रक्त प्रकार असलेल्या ऑस्ट्रेलियातील महिलांना अ‍ॅटी-डीचे तब्बल 30 लाखांहून अधिक डोस देण्यास आले.

केवळ 50 जणांना मिळालंय हे वरदान

ऑस्ट्रेलियामध्ये केवळ 50 जणांमध्ये नैसर्गिकरित्या या अ‍ॅण्टीबॉडीज आढळतात. हॅरिसन यांच्या रक्तामध्ये या अ‍ॅण्टीबॉडीज कशा तयार झाल्या हे अद्याप समजलेलं नाही. 14 व्या वर्षी झालेल्या शस्त्रक्रीयेमुळे हॅरिसन यांच्या रक्तामध्ये या अ‍ॅण्टीबॉडीज तयार झाल्याचं सांगितलं जातं.

अनेक पुरस्कार

हॅरिसन यांना त्यांच्या या समाजउपयोगी कार्यासाठी अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्यांना 'मेडल ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.