दिल्ली : दिवाळीपासून राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांसंख्येत वाढ होताना दिसतेय. सणासुदीचा हंगाम संपल्याने कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ हे धोक्याचं चिन्हं आहे. सणांच्या आधीही लोकांना आवश्यक नियमांचं पालन करण्याचा इशारा देण्यात आला होता, परंतु असं असतानाही, तीन आठवड्यांच्या अंतरानंतर, कोविड -19 मुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाला तर 62 नवीन रुग्ण आढळले. तसंच, संसर्ग दर 0.12% पर्यंत वाढला आहे.
दिल्लीच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे प्राण गमावलेल्या व्यक्तींची संख्या 25,093 झाली आहे. यापूर्वी, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोविड -19 मुळे मृत्यूचं प्रकरणं 22 ऑक्टोबर रोजी समोर आलं होतं. दिल्लीत ऑक्टोबरमध्ये 4 तर सप्टेंबरमध्ये 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
ताज्या हेल्थ बुलेटिननुसार, शुक्रवारी संसर्ग दर 0.12 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यासह, कोरोना संसर्गाच्या एकूण प्रकरणांची संख्या 14,40,332 वर पोहोचली आहे. शहरातील 14.14 लाखांहून अधिक रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत. कोविड-19चा शोध घेण्यासाठी एका दिवसात 49,874 नमुने तपासण्यात आले आहेत.
दिल्लीत कोविड -19ची 40 नवीन प्रकरणं एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी पहायला मिळाली होती. त्यावेळी संसर्ग दर 0.08% नोंदवला गेला होता. याआधी बुधवारी, महामारीची 54 नवीन प्रकरणं नोंदवली गेली आणि संसर्ग दर 0.09% नोंदवला गेला. तर त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी 33 प्रकरणांसह संसर्ग दर 0.06% नोंदवला गेला.