मुंबई : पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी वापरली जाणारी वेलची किती गुणकारी आहे, याची कल्पना तुम्हाला नाही. तसे आपले मसल्याचे सर्वच पदार्थ फायदेशीर आहेत. त्यात वेलचीचेही भरपूर फायदे आहेत. मात्र त्याचे सेवन प्रमाणातच असावे. अतिसेवनाचे दुष्परिणाम होऊ शकतात. जाणून घेऊया वेलचीचे अनेक फायदे...
वेलचीमध्ये तेलाचे प्रमाण असते. त्यात असलेल्या इसेंशियल ऑईलमुळे पोटाच्या आतील लेयर्स मजबूत होतात. अॅसिडीटीमुळे पोटात अॅसिड जमा होते. वेलचीच्या सेवनाने ते हळूहळू कमी होते.
तणावमुक्तीसाठी वेलची खाणे फायदेशीर ठरते. तणावात असताना वेलची तोंडात घालून चावा. वेलचीमुळे हार्मोन्समध्ये पटकन बदल होऊन तणावमुक्त होण्यास मदत होते.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदयासंबंधिचे आजार जडतात. पण हृदयाची गती सुरळीत ठेवण्यासाठी वेलची खाणे फायदेशीर ठरते. त्यात पोटॅशियम, कल्शियम, मॅग्नेशियम यांसारखे पदार्थ असतात. त्यामुळे या सर्व पोषकघटकांचा लाभ शरीराला होतो.
वेलची खाल्याने फुफ्फुसात रक्तसंचार जलद गतीने होऊ लागतो. त्याचबरोबर अस्थमा, खोकला, सर्दी यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी वेलची लाभदायी ठरते. उच्च रक्तदाबामुळे इतर अन्य आरोग्याच्या समस्या उद्भवतात. पण दररोज 2-3 वेलची खाल्यास ही समस्या उद्भवण्याला आळा बसेल.
तोंडाला दुर्गंधी येत असल्यास तोंडात वेलची टाका. हे एक उत्तम माऊथ फ्रेशनर आहे.
बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास वेलची खा. त्यामुळे पचनक्रीया सुधारेल आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल.
प्रवासात उलटी होत असल्यास वेलची खाल्याने ही समस्या दूर होईल.