मुंबई : कांदा हा पदार्थ भारतीयांच्या अगदी जवळचा आहे. भारतातील असं फार कमी स्वयंपाक घर असेल, जेथे तुम्हाला कांदा पाहायला मिळणार नाही. शाकाहारी जेवण असो की मांसाहारी आपल्याला सगळ्या जेवणात कांदा लागतोच, कारण या शिवाय जेवणाला चव नाही. कांदा वापरताना आपण आधी त्यावरती साल काढतो आणि मग कांदा कापून वापरतो. ज्यानंतर आपण कांद्याची ही साल कचऱ्यात टाकून देतो. परंतु तुम्हाला माहितीय, तुम्ही असं करुन तुमचं फार मोठं नुकसान करताय. कारण कांद्याप्रमाणेच त्याची साल देखील खूप उपयुक्त आहे आणि बहुतेकांना हे माहीत नाही. तर कांद्याची सालीचे काय फायदे आहेत आणि ती कशासाठी वापरली जाऊ शकतात ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जर तुम्हाला बागकामाची आवड असेल तर झाडांच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही बाजारातून खत नक्कीच विकत घेतले असेल. परंतु तुम्हाला माहितीय का की यासाठी कांद्याची साल किती गुणकारी आहे. तुम्ही खत म्हणून कांद्याची साल वापराल, तर यामुळे तुम्हाला फायदा होईल. कांद्याच्या सालीला मातीने भरलेल्या भांड्यात गोळा करा आणि त्यात पाणी टाकत राहा. असे केल्याने, काही दिवसांत कांद्याच्या सालीपासून कंपोस्ट तयार केले जाईल, जे तुम्ही झाडांमध्ये खत म्हणून टाकू शकता.
अनेक वेळा, दिवसभर काम करूनही, एखाद्या व्यक्तीला रात्री चांगली झोप लागत नाही, ज्यामुळे तणाव आणि थकवा येऊ लागतो. अशा परिस्थितीत या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी कांद्याच्या सालीपासून तयार केलेला चहा प्यावा. कांद्याच्या सालीपासून बनवलेला चहा प्यायल्याने चांगली झोप लागते, तर मेंदूच्या स्नायूंना आराम मिळतो. अशा स्थितीत तुम्हाला शरीर, मन आणि स्नायूंना विश्रांती मिळते आणि व्यक्ती चांगली आणि गाढ झोप घेऊ शकते.
कांद्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असल्याने यामुळे खाज येण्यापासून आराम मिळतो. कांद्याच्या सालीमध्ये बुरशीविरोधी गुणधर्म आढळतात, जे ऍथलीट फूट नावाच्या त्वचेच्या खाज सुटण्यासारख्या आजारांपासून मुक्त होण्यास फायदेशीर ठरतात. यासाठी कांद्याची साले पाण्यात टाकून चांगले उकळा आणि हे पाणी उकळून अर्ध झाल्यावर त्याला थंड करून बाटलीत भरा. आता हे पाणी रोज त्वचेवर लावा, ज्यामुळे संक्रमित भागावर खाज येण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.
जर तुम्हाला पाय दुखणे आणि स्नायूंच्या क्रॅम्पचा त्रास होत असेल, तर या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही कांद्याच्या सालीपासून तयार केलेला चहा घेऊ शकता. यासाठी 1 ग्लास पाण्यात कांद्याची साल टाका आणि 15 मिनिटे उकळा, त्यानंतर पाणी गाळून घ्या. तुम्हाला हवे असल्यास कांद्याच्या सालीपासून बनवलेल्या चहाची चव वाढवण्यासाठी तुम्ही थोडे मधही घालू शकता. रोज रात्री झोपण्यापूर्वी कांद्याच्या सालीपासून बनवलेला चहा घेतल्याने पाय दुखणे आणि पेटके येणे यापासून आराम मिळतो.
- केसांना सुंदर आणि आकर्षक बनवायचे असेल तर कांद्याच्या साली वापरून केसांसाठी नैसर्गिक रंग तयार करता येतो. यासाठी कांद्याची साले पाण्यात टाकून सुमारे 1 तास उकळा, त्यानंतर रात्रभर थंड होण्यासाठी ठेवा. दुसर्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि केसांवर हेअर डाई प्रमाणे लावा आणि 30 मिनिटे थांबा आणि नंतर त्याला धूवा.
- केस गळणे ही आजकालची सामान्य समस्या आहे. अशा परिस्थितीत कांद्याची साल वापरून तुम्ही तुमच्या केसांची वाढ करु शकता, यासाठी तुम्हाला साल पाण्यात उकळवावी लागतील. यानंतर त्या पाण्याने केस धुवा, असे केल्याने केस लवकर वाढतात आणि कोंड्याची समस्याही दूर होते. खरं तर, कांदा आणि त्याच्या सालीमध्ये सल्फरचे प्रमाण आढळते, जे केसांची वाढ वाढवण्यास मदत करते. याशिवाय कांद्याच्या सालीपासून तयार केलेले पाणी नियमित वापरल्याने केस काळे आणि दाट होतात.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)