मुंबई : वातावरणात बदल झाला की त्याचा लगेचच परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पावसाळा म्हटला की आजार हे आलेच. यावेळी सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे अधिक दिसून येतात. मात्र या आजारांवर तुम्ही घरच्या घरी सोपे उपाय करु शकता. सर्दी झाल्यास तुमच्या किचनमधील काही पदार्थांचा वापर करुन यावर मात करु शकता.
घश्यात त्रास असल्यास मधाच्या सेवनाने फायदा होतो तर आल्यामध्ये अँटीबायोटिक गुण असतात. आले आणि मध समप्रमाणात घेऊन एकत्र वाटा. या मिश्रणात तुम्ही अर्धा ग्लास दुधही मिसळू शकता. यामुळे सर्दी बरी होते. तसेच घश्याचा त्रास होत असल्यास तोही बरा होतो.
हळदीचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. हळकुंड एका बाजूने जाळा. त्याच्या गंधाने तुम्हाला सर्दीपासून सुटका मिळू शकते.या यासोबतच दुधातही तुम्ही हळद टाकून प्यायल्यास घसा मोकळा होतो.
सर्दीमध्ये अळशीचा वापर प्रामुख्याने केला जातो. पाण्यात अळशी टाकून हे पाणी उकळवा. जोपर्यंत हे मिश्रण दाट होत नाही तोपर्यंत उकळवत राहा. यात लिंबाचा रस आणि मध टाका. सर्दीचा त्रास सतावत असेल तर दिवसातून दोन वेळा हे मिश्रण घ्या.
आयुर्वेदात गुळाला महत्त्वाचे स्थान आहे. पाण्यात काळी मिरी टाकून पाणी उकळवा. यात थोडे जिरे टाका. त्यानंतर गुळाचा खडा टाका. जेव्हा गूळ पाण्यात विरघळून जाईल तेव्हा गॅस बंद करा. घश्यात खवखव होत असल्यास हे पाणी प्या.