श्रावण महिन्यात उपवास करताना आरोग्य जपण्यासाठी खास डाएट टीप्स

श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Updated: Aug 8, 2018, 07:59 PM IST
श्रावण महिन्यात उपवास करताना आरोग्य जपण्यासाठी खास डाएट टीप्स    title=

मुंबई : श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. श्रावण महिना हा हिंदू धर्मातील पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्यात व्रतवैकल्यांसोबतच उपवास केले जातात. 
उपवासाचे महत्त्व धार्मिक कारणांपुरता मर्यादीत नाही तर या दिवसात उपवास करण्याचे काही आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. त्यामुळे तुम्हीही उपवास करणार असाल ? तर या दिवसांमध्ये आहारात काही सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे. याकरिता लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालयाचे डॉ. पवन लड्डा यांनी दिलेला हा डाएट प्लॅन नक्कीच आरोग्याचं गणित सांभाळत उपवास करण्यास मदत करणार आहे.  उपवास करण्याचे आरोग्यदायी फायदे 

उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल ? 

*दिवसातून दोन वेळाच जेवण करणार असाल तर सकाळी ८ ते ११ यावेळेत व संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत जेवणे हितकारी आहे.
*दोन जेवणाच्या दरम्यान १-२ वेळा बिनसाखरेचे लेमन टी/ डिकासिन/ चहा/ कॉफी/ दुध-हळद/ लिंबूपाणी/ गवती चहा काढा पिऊ शकता. मात्र केवळ 2 कप चहा पिणं हितकारी.
*सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपताना उकळलेले पाणी प्यावे. फ्रीजचं, माठाचं पाणी टाळा. 
* सकाळी तासभर ५-६ किमी भराभर चाला
* फिरायला जाण्यापुर्वी ग्लासभर कोमट पाणी आणि आल्यानंतर बिनसाखरेचे १ कप लेमन टी पिऊ शकता.  

उपवासाच्या दिवसात सकाळी काय खाल ?

१)  २-३  सफरचंद
२)  २-३ केळी /१-२ पिकलेली किवीची फळे
३) २-३ राजगिरा लाडू व एक ग्लास सुंठ-हळदीचे बिनसाखरेचे दुध 
४) वरीचे तांदूळ + दाण्याची आमटी + एक चमचा घरी बनविलेले तूप 
५) १ राजगिरा पोळी व १ वाटी उपवासाच्या भाज्या. 
६) १-२ मध्यम वाटी गूळ घालून बनविलेले नारळीभात
७) १-२ मध्यमवाटी भगर व ताकाची कढी २ वाटी
८) १ वाटी दही व खिसलेल्या २ काकड्या यांची कोशिंबीर
९) १-२ ग्लास ताज्या दह्याचे ताजे ताक 
१०) खजूर मिल्क शेक -साहित्य- २ कप दूध, ३-४ खजूर, ३ ते ४ बदाम, २ हिरवी वेलची, - खजूर, बदाम, वेलची चांगले साफ करून त्याचे बारीक तुकडे करा. दुध व सर्व पदार्थ एकत्र करुन मिकसरमध्ये फिरवा.
११) १ वाटी रताळाचा कीस -साहित्य - रताळे, दाण्याचे कूट, मीठ, मिरच्या, तूप जिरे. कृती - रताळे स्वच्छ धुवून, साले काढून किसून घ्यावेत, नंतर किसही पाणी घालून स्वच्छ धुवावा व पिळून ठेवावा. जिरे घालून तूपाची फोडणी करावी. त्यावर मिरच्यांचे तुकडे व रताळाचा किस घालून परतावे, नंतर त्यात दाण्याचे कूट व मीठ घालून चांगले ढवळून झाकण ठेवावे. मधून मधून कीस हलवावा. शिजला की उतरवावा. गरमच खायला द्यावा. 
१२) १ वाटी बटाटयाचा कीस -साहित्य - बटाटे, दाण्याचे कूट, मीठ, मिरच्या, तूप जिरे. कृती - बटाटे स्वच्छ धुवून, साले काढून किसून घ्यावेत, नंतर किसही पाणी घालून स्वच्छ धुवावा व पिळून ठेवावा. जिरे घालून तूपाची फोडणी करावी. त्यावर मिरच्यांचे तुकडे व बटाटयाचा किस घालून परतावे, नंतर त्यात दाण्याचे कूट व मीठ घालून चांगले ढवळून झाकण ठेवावे. मधून मधून कीस हलवावा. शिजला की उतरवावा. गरमच खायला द्यावा.
१३) १ वाटी वरीच्या तांदळांचा फोडणीचा भगर - साहित्य :-वरीचे तांदूळ एक वाटी, हिरव्या मिरचीचे तुकडे, जिरे, मीठ, साखर,  पाणी, दाण्याचे कूट. ... कृती :-१) तांदळाप्रमाणे वरीचे तांदूळ धुवून परतून घ्यावेत. त्यानंतर एका पातेलीत एक चमचा घरी बनविलेले साजुक तूप गरम करत ठेवावे. त्यातच जिरे आणि मिरचीचे तुकडे घालावेत. त्यावर वरीचे तांदूळ घालून परत एकदा परतून घ्यावे. आणि साधारण दुप्पट उकळते पाणी घालून फोडणीचे भगर शिजवून घ्यावे. भगर शिजल्यानंतर त्यात दाण्याचे कूट घालावे. तूप सोडावे. म्हणजे भात मोकळा होईल. गरम गरम फोडणीचे भगर खायला द्यावे. 
१४) उपवासाची भगरीची ४-५ नग इडली - साहित्य : वरई तांदूळ चार कप, हिरव्या मिरच्या ३/४, आले वाटण अर्धा चहाचा चमचा, जिरे चहाचा अर्धा चमचा, मीठ, तूप, खाण्याचा सोडा, कृती : वरई निवडून आधीच चार तास भिजत ठेवा. पाणी जास्त वापरू नका. भिजवून ठेवलेली वरई. मिरच्यांचे तुकडे, जिरे मिक्सरमध्ये घाला. बारीक झाल्यावर बाहेर काढून त्यात मीठ, आले वाटण, हवे असल्यास थोडे दाण्याचे कूट टाका. कालवा.मग इडली पात्र घेऊन साच्यांना तुपाचा हात चोळा, इडली पिठात थोडासा सोडा टाका. पुन्हा कालवा. हे मिश्रण साच्यात थोडे थोडे ओता. इडली करतो त्याप्रमाणे वाफवून घ्या. थोड्या दह्यात मीठ, जिरेपूड टाकून कालवून याला लावून इडल्या खा.
१५) १-२ डाळिंब किंवा  १-२ नारळ पाणी 

 यापध्दतीने पुढील १५ दिवस वरील पदार्थ रिपीट करू शकता. 

 संध्याकाळी काय खाल ? 

 १ पालेभाज्यांचे थालीपीठ व  २ वाटी ताकाची कढी
 १ -२ प्लेट हिरव्या मुगाची वाफविलेली उसळ
 १ ज्वारीची पातळ भाकरी व १ वाटी पिठल
१ ज्वारीची पातळ भाकरी व १ वाटी घट्ट दालफ्राय
 १-२ मध्यम वाटी भाजलेली मुग दाळ-भाजलेले तांदुळ - भरपूर पालेभाज्या यांची खिचडी व २ वाटी ताकाची पातळ कढी 
 १ ज्वारीची पातळ भाकरी व १ वाटी दाण्याची आमटी
 १ ज्वारीची पातळ भाकरी व सिमला मिरची किंवा कोबीची भाजी
 वरीच्या तांदुळाचे १ थालीपीठ - साहित्य - वरीचे तांदुळ बुडतील इतक्या पाण्यात ४-५ तास भिजत घालावे नंतर बारीक वाटावे. वाटतांना त्यात जिरे व मीठ घालावे. नंतर दाण्याचे कूट व कच्च्या बटाटयाचा किस घालावा. हे पदार्थ एकत्र मिसळावेत. त्यात जरूरीएवढे पाणी घालून मळून थालीपीठ लावावे किंवा अधिक पाणी घालून धिरडे पसरावे. आवश्यकता असेल तर सोबत एक वाटी कढी घ्यावी. 
यापध्दतीने वरील पदार्थ बदलून बदलून दररोज संध्याकाळी ठरलेल्या वेळी खावे.

यापध्दतीने वरील पदार्थ अदलून बदलून दररोज संध्याकाळी ठरलेल्या वेळी खाऊ शकता.