कोरोनाचा धोका वाढला; गेल्या 20 दिवसांत 100 हून अधिकांचा मृत्यू

आरोग्य विभागाकडून सातत्याने खबरदारी घेण्याचे आवाहन केलं जातंय.

Updated: Aug 21, 2022, 06:36 AM IST
कोरोनाचा धोका वाढला; गेल्या 20 दिवसांत 100 हून अधिकांचा मृत्यू title=

दिल्ली : कोरोनाची आकडेवारी पुन्हा एकदा चिंता वाढवताना दिसतेय. गेल्या 24 तासांत दिल्लीत 1109 नवीन रुग्ण आढळले असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोना पॉझिटिव्ह रेट 11 टक्क्यांहून अधिक आहे. 20 दिवसांत 100 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील आरोग्य विभागाकडून सातत्याने खबरदारी घेण्याचे आवाहन केलं जातंय.

दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासात याठिकाणी 1109 रुग्ण आढळले आहेत. 9874 नमुने तपासण्यात आलेत. तर पॉझिटीव्हिटी रेट 11.23 टक्के आहे. दिवसभरात 1687 रुग्ण बरे झाले असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत 5559 एक्टिव्ह प्रकरणं आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत 3954 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात 496 रुग्ण उपचार घेत आहेत. 394 रुग्ण दिल्लीचे रहिवासी असून 102 रुग्ण बाहेरगावचे आहेत. तर एकूण 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

दिल्लीत 20 दिवसांत 107 जणांचा मृत्यू 

दिल्लीच्या आरोग्य विभागाने असंही म्हटलंय की, ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत याठिकाणी 100 हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ऑगस्टच्या 20 दिवसांत एकूण 107 मृत्यू झालेत.

महाराष्ट्रात 1855 रुग्ण 

शनिवारी महाराष्ट्रात 1855 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह 2 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोरोनाचे 11866 सक्रिय रुग्ण आहेत. एक दिवस आधी, शुक्रवारी राज्यात 2,285 रुग्ण आढळले आणि त्यात 5 मृत्यूंची नोंद होती.