मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 3 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळलेत. तर दुसरीकडे एकट्या राजधानी मुंबईत कोविडचे 1,956 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. मात्र, या कालावधीत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून, मुंबईत सध्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या 9 हजारांच्या पुढे आहे.
मुंबईत गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सुमारे 15 टक्के अधिक प्रकरणं नोंदवली गेलीत. यामध्ये पॉझिटीव्हिटी रेट 12.74 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. मुंबईत शुक्रवारी नोंदवलेले 1956 प्रकरणं 22 जानेवारीनंतरची सर्वाधिक असल्याची नोंद केली गेलीये.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांनी चिंता वाढवली असून आठवडाभरात राज्यातील नवीन रुग्णांची संख्या जवळपास तीन पटीने वाढली आहे. पहिल्या कोरोना लाटेप्रमाणेच महाराष्ट्र पुन्हा कोरोनाचं केंद्र बनताना दिसतंय.
राज्यात शुक्रवारी 3 हजार 81 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आलीये. धक्कादायक म्हणजे 24 तासांमध्ये मुंबईत 1 हजार 956 जणांना कोरोना झाला आहे. गुरुवारी राज्यातील आकडा हा 2 हजार 813 इतका होता. तर मुंबईत 1 हजार 702 इतके पॉझिटिव्ह होते.
चिंताजनक बाब म्हणजे राज्यात शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्या ही 3 हजार पार गेली. तर मुंबईतील कोव्हिड रुग्णांचा आकडा हा 2 हजारच्या नजीक येऊन ठेपला आहे. तसंच सक्रीय रुग्णांचाही संख्या वाढली आहे.