कोरोनामुक्त झालेल्यांना Covaxinच्या दोन डोसची गरज नाही?

लसीकरणासंदर्भात  इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने एक नवं संशोधन केलं आहे.

Updated: Aug 29, 2021, 10:24 AM IST
कोरोनामुक्त झालेल्यांना Covaxinच्या दोन डोसची गरज नाही? title=

मुंबई : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. अशातच लसीसंदर्भात आयसीएमआर म्हणजे इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने एक नवं संशोधन केलं आहे. या नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, जर कोव्हॅक्सिनचा एकच डोस एखाद्या व्यक्तीला दिला गेला आहे जो आधी कोरोना विषाणूने संक्रमित झाला असेल तर त्या व्यक्तीला दोन डोस इतकीच अँटीबॉडीज तयार होतात. 

शनिवारी 'इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च' मध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. 

यामध्ये पुढे म्हटलं आहे की, "जर आमचे प्रारंभिक परिणाम व्यापक लोकसंख्येमध्ये केलेल्या संशोधनात पुष्टी झाली तर BBV 152 लसीचा एक डोसंही SARS-CoV-2 (SARS-Cov 2) संक्रमित व्यक्तींसाठी पुरेसा आहे. असं केल्याने अधिकाधिक लोकांना लस मिळू शकेल. 

कोव्हॅक्सिन ही भारतातील पहिली स्वदेशी लस आपात्कालीन वापरासाठी सरकारने जानेवारीमध्ये मंजूर केली होती. 4 ते 6 आठवड्यांच्या अंतराने दोन डोस दिले जातात. या लसीचं कोड नाव BBV 152 आहे. 

या संशोधनात असंही म्हटलं गेलं आहे की, ज्या लोकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मिळाला होता आणि त्याआधी त्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या अँटीबॉडीजची तुलना कोरोनाचे दोन्ही डोस घेणाऱ्यांशी करण्यात आली. या तुलनेत, संशोधकांना दोघांच्या अँटीबॉडीज समान आढळल्या. या संशोधनात, फेब्रुवारी 2021 ते मे 2021 पर्यंत चेन्नईमधील लसीकरण केंद्रांवर लस घेतलेल्या 114 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले.

दरम्यान कोरोना लसीकरणाच्या बाबतीत देशाने शुक्रवारी एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतात, शुक्रवारी एकूण 1 कोटी 64 हजार लोकांना लसीकरण करण्यात आलं. याची माहिती पंतप्रधान मोदींनी स्वतः ट्वीट करून देशवासियांना दिली होती.