विकास भोसले, झी मिडीया, सातारा: पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांचा हा मेळा जगभरातील लोकांसाठी एक उत्सुकतेचा आणि तितकाच आश्चर्यकारक आनंदसोहळा म्हणावा लागेल... कोणी मोठा नाही... कोणी लहान नाही. कोण कोणाला नाव विचारत नाही, जात विचारत नाही. वारीत सहभागी होणारा प्रत्येकजण आहे केवळ आणि केवळ माऊली...
राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो दिंड्या पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतात. लाखो वारकऱ्यांना एकत्र आणणाऱ्या या दिंड्यांचं मॅनेजमेंट कसं असतं याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. सकाळी सहाच्या ठोक्याला वारकरी पुढच्या प्रवासाला निघतात. पहिला विसावा, त्यानंतर भोजन, त्यानंतर पुन्हा पुढच्या गावाची ओढ आणि त्यानंतर रात्रीचा मुक्काम हे वरकरणी सोपं वाटत असलं तरी यामागे असते ते नियोजन. यात वारकऱ्यांची स्वयंशिस्त हा सर्वाधिक महत्वाचा मुद्दा आढळतो. दिंडीत सहभागी वारकरी आणि सेवेकरी यांची लगबग पहाटे तीन वाजता सुरू होते. सामान ठेवण्याची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था याबाबत प्रत्येकाला स्वतंत्र जबाबदारी दिली जाते.
दुपारी १२ वाजता दिंडीत चालणारे वारकरी ठरलेल्या ठिकाणी येतात. या वारकऱ्यांची पहिली पंगत होते. त्यानंतर इतर वारकरी, सेवेकरी मोकळ्या समाजातून चालणारे वारकरी यांची दुसरी पंगत होते. भोजनानंतर वारकरी थोडावेळ विसावा घेतात. नगारा वाजल्यानंतर लगेच पालखीच्या पुढे किंवा मागे नेमून दिलेल्या जागेवर आपल्या दिंडीमध्ये सहभागी होतात.