वडील ओशोंचे अनुयायी होणार समजताच काय होती अक्षय खन्नाची प्रतिक्रिया?

हा संन्यासच होता, पण...

Updated: Oct 6, 2020, 06:30 PM IST
वडील ओशोंचे अनुयायी होणार समजताच काय होती अक्षय खन्नाची प्रतिक्रिया?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई :  रुपवान, रुबाबदार अशी ओळख असणाऱ्या विनोद खन्ना यांनी त्यांच्या अभिनयासोबतच अनोख्या व्यक्तीमत्त्वामुळं अनेकांच्या मनावर राज्य केलं. एक काळ गाजवणारा हा अभिनेता आता आपल्यात नसला, तरीही त्यांच्या कलाकृती आणि आठवणींच्या माध्यमातून मात्र विनोद खन्ना हे नाव कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहणार आहे. 

रुपेरी पडद्यावर खन्ना यांचं जीवन जितकं आकर्षक वाटत होतं, तितकंच किंबहुना त्याहूनही जास्त कुतूहल हे त्यांच्या खासगी आयुष्याविषयी पाहायला मिळालं. ८० च्या दशकात  करिअरमध्ये योग्य मार्गावर आणि प्रसिद्धीझोतात असतानाच विनोद खन्ना यांनी या कलाविश्वाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. आध्यात्मिक गुरु ओशो रजनीश यांच्या तत्त्वांना पाळत त्यांचे अऩुयायी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. जवळपास पाच वर्षांसाठी त्यांनी हा मार्ग अवलंबला आणि हा काळ ते झगमगाटापासून दूर राहिले. 

आपल्या वडिलांच्या याच निर्णयाच्या वेळी नेमकी प्रतिक्रिया काय होती, याचा उलगडा अभिनेता अक्षय खन्ना यानं बऱ्याच महिन्यांपूर्वी 'मिड डे'ला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान केला होता. अक्षय त्यावेळी अवघ्या पाच वर्षांचा होता. माझे वडील तेथे का नव्हते याच्याशी ओशो यांचा त्यावेळी काहीच संबंध नव्हता. वयाच्या पाचव्या वर्षी या सर्व गोष्टी अनाकलनीय होत्या, असं त्यानं सांगितलं होतं.  पण, या सर्व गोष्टी पुढं वयाच्या १५- १६ वर्षांच्या टप्प्यावर ऐकून, वाचून उमगू लागल्या असंही त्यांनं सांगितलं. 

'हे तर फक्त कुटुंबाला सोडणंच नव्हे, तर संन्यास घेणं.... संन्यास म्हणजे एका अर्थी संपूर्ण आयुष्यच वाहून देणं. कुटुंब हा तर त्याचा एक एक भाग आहे. हा निर्णयच मुळात आयुष्य बदलून टाकणारा असतो. त्यावेळी त्यांना (विनोद खन्ना) यांना हा निर्णय घ्यावासा वाटला. एक पाच वर्षांचा मुलगा म्हणून मला तेव्हा हे सारं समजलं नव्हंत. पण, आता मला ते कळत आहे', असं तो म्हणाला होता. 

 

आयुष्याच्या एका टप्प्यावर सारंकाही असूनही काहीतरी आणखी मिळव्यासाठीची ती अनुभूती होती, असं म्हणत एका वेगळ्याच भावनेनं किंवा जाणीवेनं त्यांच्या अंतर्मनाला साद घातली होती असं त्यानं सांगितलं. अतिशय संवेदनशीलपणे अक्षयनं या साऱ्या प्रसंगांकडे पाहिलं होतं हेच त्याच्या या मुलाखतीतून स्पष्ट झालं.