मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अवघा महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील यांनी ढवळून काढला. मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध "संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांच्या भूमिकेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी दिसणार आहेत. २६ एप्रिलला 'संघर्षयोद्धा' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली असून , सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.
सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटातून दमदार भूमिका साकारल्या आहेत. अगदी खलनायकी भूमिकांपासून चरित्र भूमिकांपर्यंतचं वैविध्य त्यांच्या अभिनयात आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका त्यांच्या आजवरच्या भूमिकांमध्ये एक लक्षणीय भूमिका ठरणार आहे. स्वतःच्या मुलाचा संघर्ष, त्याची उपोषणं, राज्यभरातून मराठा समाजाकडून मिळणारा पाठिंबा या काळात एका वडिलांची घालमेल मोहन जोशी यांच्या सशक्त अभिनयातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. "संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता फक्त २६ एप्रिल पर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता संघर्षयोद्धा या चित्रपटातून मांडली जाणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. एका लढवय्या कार्यकर्त्याच्या लढवय्या पत्नीची ही भूमिका असून २६ एप्रिल रोजी 'संघर्षयोद्धा' बॉक्स ऑफिसवरही धमाल उडवून देण्यासाठी सज्ज आहे.