ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन

कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता

Updated: Sep 22, 2020, 08:44 AM IST
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मराठी चित्रपट आणि नाट्य विश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या आणि एक काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालं आहे. त्यांची coronavirus covid 19 कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. 

सातारा येथील रुग्णालयात त्यांच्यावर यासाठीचे उपचारही सुरु होते पण, अखेर कोरोनाशी त्यांचा लढा अपयशी ठरला. सातारा येथील फलटण तालुक्यात 'माझी आई काळूबाई' या मालिकेच्या शुटिंग दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 

१६ सप्टेंबर रोजी त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर सोमवारी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त समोर आलं. 

 

मागील महिन्याभरापासून या मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली होती. याचदरम्यान  मालिकेच्या सेटवरील काहीजणांनाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतर साऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आशालता वाबगावकर यांचा देखील समावेश होता. 

अभिनेते अशोक सराफ यांनी आशालता वाबगावकर यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. 'झी२४ तास'शी संवाद साधताना कलाविश्वानं एक चतुरस्त्र अभिनेत्री गमावल्याचं ते म्हणाले. नाट्य आणि चित्रपच वर्तुळात वाबगावकर यांचा वावर अतिशय उल्लेखनीय होता, असं म्हणत एक व्यक्ती म्हणूनही त्यांनी कायमच सर्वांची मनं जिंकली असं म्हणत अशोक सराफ यांनी या हरहुन्नरी अभिनेत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.