'तारक मेहता' शो वादाच्या भोवऱ्यात? नेहा मेहताचा निर्मात्यांवर पैसे न दिल्याचा आरोप 

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्ही मालिका सर्वात जास्त काळ चालणाऱ्या कार्यक्रमांपैकी एक आहे.

Updated: Jun 25, 2022, 06:31 PM IST
'तारक मेहता' शो वादाच्या भोवऱ्यात? नेहा मेहताचा निर्मात्यांवर पैसे न दिल्याचा आरोप  title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्ही मालिका सर्वात जास्त काळ चालणाऱ्या कार्यक्रमांपैकी एक आहे. या शोशी संबंधित प्रत्येक पात्र प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. एवढंच नाही तर चाहते शोमधील कलाकारांना त्यांच्या खऱ्या नावाने नव्हे तर पात्रांच्या नावाने ओळखतात.

अलीकडेच 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील अनेक कलाकारांनी शो सोडला आहे. ज्यात दिशा वकानी, भव्य गांधी, निधी भानुशाली, शैलेश लोढा आणि नेहा मेहता यांचा समावेश आहे. त्याचबरोबर, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नेहा मेहताने दावा केला होता की, शोच्या निर्मात्यांनी तिचा उर्वरित पगार दिला नाही.  नेहा शोच्या सुरुवातीपासूनच 'अंजली भाभी'ची भूमिका साकारत होती.

निर्मात्यांनी मौन तोडलं
आता शोच्या निर्मात्यांनी अखेर एक निवेदन जारी करून मौन सोडलं आहे. निवेदनात असं म्हटलं आहे की, 'आम्ही आमच्या कलाकाराला आमचं कुटुंब मानतो. फॉर्मेलिटी पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहा मेहताशी अनेकदा संपर्क साधला. पण दुर्दैवाने ती शो सोडण्यासाठी कागदपत्रांवर सही करायला तयार होत नव्हती. ज्याशिवाय आम्ही अंतिम तोडगा काढू शकत नव्हतो. गेल्या दोन वर्षांपासून तिने आम्हाला उत्तर देणंही बंद केलं. आणि  ती आम्हाला न भेटताच शोमधून निघून गेली.

निर्मात्यांनी हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे
'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते पुढे म्हणाले, 'नेहाने निर्मात्यांवर खोटे आरोप करण्याऐवजी आमच्या ईमेलला उत्तर द्यावं अशी आमची इच्छा आहे. तिने 12 वर्षे या शोमध्ये काम केलं आहे. दरम्यान, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये अनेक वर्षांपासून प्रेक्षक 'दयाबेन'च्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दिशा वाकानीने शो सोडल्यापासून निर्मात्यांना दयाबेनच्या पात्रासाठी योग्य पर्याय शोधण्यात अक्षम आहे. मात्र, निर्मात्यांनी सांगितलं की, ते दयाबेनची भूमिका करण्यासाठी अभिनेत्रीच्या शोधात आहेत.