मुंबई : सुपरहिट संगीतमय चित्रपट 'कट्यार काळजात घुसली' नंतर पुन्हा एकदा अभिनेता - दिग्दर्शक सुबोध भावे, चित्रपट "मानापमान" द्वारे भव्यदिव्य संगीतमय नजराणा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेवून येण्यास सज्ज झाले असून, आज ग्वालियर मध्ये चित्रपटाची संपुर्ण टीम शूटींगसाठी पोहचली असून पुढचे काही दिवस ओरछा मधील विलक्षण ठिकाणी चित्रपटातील खूप महत्वाचे सीन शूट केले जाणार आहेत. बहुप्रशांसित चित्रपट कट्यार काळजात घुसली आणि डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत आहे.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'मी वसंतराव', 'गोदावरी' आणि 'बाईपण भारी देवा'चे बॉक्स ऑफिसवरील प्रचंड यश साजरे केल्यानंतर जिओ स्टुडिओज् आता कृष्णाजी खाडिलकर लिखित "संगीत मानापमान" या प्रसिद्ध नाटकावरून प्रेरित होवून ही नवीन संगीतमय कलाकृती घेऊन येत आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनीत "मानापमान" चित्रपटाचे चित्रीकरण भारतातील वेगवेगळ्या नेत्रदीपक ठिकाणी होणार असून, आकर्षक वेशभूषा आणि सुमधुर संगीत चित्रपटाची ठळक वैशिष्ट्ये आहेत . अजूनही मुख्य पात्रांची ओळख गुलदस्त्यात असून कलाकारांची नावं जाणून घेण्यासाठी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सगळ्यांची उत्सुकता वाढलेली आहेत.
प्रसिध्द संगीतकार शंकर- एहसान-लॉय यांचं संगीत असणार आहे, शिरीष गोपाळ देशपांडे यांनी पटकथा आणि संवाद लिहिलेत तर प्राजक्त देशमुख यांचे अतिरिक्त पटकथा आणि संवाद असणार आहेत. उत्तम दर्जेदार चित्रपट तुमच्या समोर घेऊन जिओ स्टुडिओज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ज्योती देशपांडे निर्मित या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
सुबोध भावे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सुबोध भावे यांनी लिहीलंय की, खेर मानापमान च्या शूटिंग ला सुरवात झाली. 'कट्यार'नंतर पुन्हा एकदा आमचा संपूर्ण संघ तुम्हाला आनंद देण्यासाठी सज्ज झालाय. पुढचे काही महिने आम्ही पुन्हा एकदा एका सुंदर प्रवासाचे साक्षी होणार,आणि पुढील वर्षी दिवाळी ला तुम्हालाही आमच्या आनंदात सहभागी करून घेणार.तुमचा आशिर्वाद आणि प्रेम असेच राहूदे.