'सरी' या मराठी सिनेमात प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याची वर्णी

 कन्नड, तुल्लू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवल्यानंतर पृथ्वी अंबर आता मराठी चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Updated: Apr 14, 2023, 08:28 PM IST
'सरी' या मराठी सिनेमात प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याची वर्णी title=

मुंबई : कन्नड, तुल्लू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवल्यानंतर पृथ्वी अंबर आता मराठी चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अशोका के. एस. यांच्या 'सरी' या चित्रपटातून पृथ्वी मराठी सिनेसृष्टीत प्रवेश करत आहे. प्रेमाचा त्रिकोण असणाऱ्या या चित्रपटात पृथ्वी मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री आणि मृणाल कुलकर्णी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. यापूर्वीच प्रेक्षकांनी गाण्यातून पृथ्वीची झलक पाहिली आहेच. आता पृथ्वी नक्की कोणत्या व्यक्तिरेखेत आहे, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

 पृथ्वी अमराठी असला तरी त्याचा मराठीशी खूप जवळचा संबंध आहे. याचा खुलासा पृथ्वीने स्वतःच केला आहे. आपल्या मराठीतील पदार्पणाबद्दल पृथ्वी अंबर म्हणतो, ''माझा जन्म कर्नाटकातील उडुपी येथे झाला असला तरी प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईला भेट देणे ही माझ्यासाठी एक परंपराच होती आणि त्यामुळेच मला मराठी भाषेची आणि संस्कृतीची ओळख झाली. माझे खूप असे जवळचे नातेवाईक आणि मित्र आहेत, जे मराठी भाषा बोलणारे आहेत. 

नटरंग, नटसम्राट आणि सैराट सारख्या अभिजात चित्रपटांचा मी चाहता आहे. सर्वोत्कृष्ट अभिनय, कलाकार आणि संगीतासाठी हे चित्रपट मी पुन्हा पुन्हा पाहतो. मी कधी कल्पनाही केली नव्हती की, मी मराठी चित्रपटात काम करेन. अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री आणि कायमच मला आवडणाऱ्या मृणाल कुलकर्णी मॅम यांच्यासारख्या अत्यंत प्रतिभावान कलाकारांसोबत मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. माझे मार्गदर्शक, दिग्दर्शक अशोका के. एस. सर यांचे मी आभार मानतो, ज्यांनी मला सहकार्य आणि बळ दिले आणि निर्मात्यांचेही आभार मानतो ज्यांनी मला ही संधी दिली. '' 

कॅनरस प्रॉडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन अशोका के. एस. यांनीच केले असून येत्या ५ मे रोजी 'सरी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
'सरी' या चित्रपटातील 'मला का भासे' हे प्रेमगीत सोशल मीडियावर प्रदर्शित झालं असून या गाण्यात दिया (रितिका श्रोत्री) आणि रोहित (अजिंक्य राऊत) यांच्यात हळुवार खुलणारं प्रेम दिसत आहे.  हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडलेले दिसत असून त्यांचा प्रेमाचा प्रवास या गाण्यात पाहायला मिळत आहे.

प्रेमाच्या सुरूवातीच्या सोनेरी क्षणांची आठवण करून देणाऱ्या या गाण्याचे सुरेल बोल मनाला भिडणारे असून संगीतही अतिशय श्रवणीय आहे. येत्या ५ मे रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.