'नाना पाटेकरांविरोधात याचिका दाखल करणार'

अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या प्रकरणात पोलिसांनी बी समरी दाखल केली होती.

Updated: Jul 7, 2019, 05:37 PM IST
'नाना पाटेकरांविरोधात याचिका दाखल करणार' title=

मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या प्रकरणात पोलिसांनी बी समरी दाखल केली होती. ज्यामध्ये नाना पाटेकरांविरोधात लैंगिक अत्याचाराप्रकरणात त्यांना क्लिन चिट देण्यात आली होती. तनुश्रीचे वकील नितीन सतपुत यांनी अंधेरी न्यायालयात तिचे प्रतिनिधित्व केले होते. तनुश्रीला न्यायालयाने बी समरीच्या विरोधात याचिका दाखल करण्यासाठी कालावधी देण्यात आला होता. यावेळी तनुश्रीची संपूर्ण कायदेशीर संघटना न्यायालयात उपस्थित होती. परंतू ओशिवारा पोलिस ठाण्यातील एकही पोलीस अधिकारी न्यायालयात उपस्थित नव्हता. 

तनुश्रीच्या खटल्याची तारीख ७ सप्टेंबर २०१९ पर्यंत वाढवण्यात आली होती. बी समरी म्हणजे खोटा खटला, गुन्हा दाखल करण्यात आल्याविषयीचा तपशील असतो.    तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या गैरवर्तवणूकीच्या आरोपांबाबत कोणताही पुरावा समोर न आल्याने नाना पाटेकर यांना या प्रकरणात दिलासा मिळाला होता. या निर्णयानंतर तनुश्री दत्ताने नाना पाटेकर आणि मुंबई पोलिसांना भ्रष्ट असल्याचे म्हटले होते. 

दरम्यान, महाराष्ट्र महिला आयोगाकडे तिने आपल्यावर झालेल्या अत्याचारांसंबंधीत निवेदनही दिले होते. याप्रकरणी तनुश्रीने केलेल सर्व आरोप महिला आयोगाकडून फेटाळण्यात आले होते. अभिनेत्री तनुश्री दत्तामुळे उदयास आलेले #Metoo चे वादळ अद्यापही शमलेले नाही. मुळात अमेरिकेत उदयास आलेली ही मोहिम तनुश्रीने भारतात रूजवली. आता हे वादळ कोणतं रूप घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.