मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे ज्येष्ठ अभिनेते नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक आता या जगात नाहीत. घनश्याम नायक गेल्या अनेक महिन्यांपासून कर्करोगाशी लढा देत होते. 3 ऑक्टोबर रोजी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. काही महिन्यांपूर्वी त्यांची दोन ऑपरेशनही झाली होती. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. घनश्याम आपल्या आजाराशी कसे लढत होते याची माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे.
घनश्याम नायक यांच्या 9 केमोथेरपी झाल्या होत्या
एका मुलाखतीमध्ये बोलताना नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक यांचा मुलगा विकासने अनेक महत्त्वाची माहिती शेअर केली. विकास संभाषणादरम्यान म्हणाला की, 'एक वर्षापूर्वी माझ्या वडिलांची कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर रेडिएशन आणि केमोथेरपी झाली.
त्यांचा कर्करोग इतका दुर्मिळ होता की उपचाराची पद्धत चाचणी-एन-एरर असल्याचं दिसतं. त्यांच्या 9 केमोथेरपी सत्र होत्या, त्यापैकी 5 गेल्या वर्षी आणि 4 या वर्षी झाल्या. यानंतर 30 रेडिएशन सत्र झाली. त्या सप्टेंबर 2020च्या आसपास होत्या आणि गोष्टी नियंत्रणात असल्यासारखही वाटत होतं, मात्र मार्च 2021 मध्ये पप्पांच्या चेहऱ्यावर सूज आली. आम्ही गृहीत धरलं की ते केमोथेरपीचा परिणाम आहे, मात्र यानंतरच्या चाचण्यांनी हे सिद्ध केलं की, त्यांचा कर्करोग त्याच्या फुफ्फुसांमध्ये पसरला आहे.
होमिओपॅथी आणि आयुर्वेदाची मदत घेतली
घनश्याम नायक यांचा मुलगा म्हणाला, 'आम्ही एप्रिल 2021 मध्ये केमोथेरपी पुन्हा सुरू केली, त्यानंतर 2021 मध्ये 4 सत्रं. जूनपर्यंत चालली, परंतु त्यांच्यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही.
सूजही कमी झाली नाही, पण बाबांनी आग्रह धरला की त्यांना अजूनही कामावर जायचं आहे आणि म्हणून त्यांनी थोडं शूटिंग केलं आणि 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ची जाहिरात केली. आम्ही यावेळी पुन्हा एक चाचणी केली आणि लक्षात आलं की, कर्करोग आता केवळ फुफ्फुसांमध्येच नाही तर शरीराच्या इतर भागांमध्येही पसरला आहे. आम्ही केमोथेरपी थांबवली आणि होमिओपॅथी आणि आयुर्वेदाची मदत घेतली. पण स्थिती अधिकच बिघडत गेली. आणि त्यांनी शेवटी या जगाचा निरोप घेतला.