Aashna shroff Success Story: अरमान मलिक आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आशना श्रॉफ यांनी साखरपुडा केला आहे. यामुळे दोघांचे चाहतेही खूप खुश आहेत. आशनाने आपल्या इन्स्टा अकाउंटवर रिंग सेरेमनीचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. 'ऑफिशिअली भविष्यातील मिस्टर आणि मिसेस.' असे कॅप्शन त्यावर लिहिले. यावेळी अरमानही खूप खुश दिसत होता. आज आशना श्रॉफ आणि अरमान ही दोन्ही नावं प्रसिद्ध आहेत. परंतु आशनाचे सुरुवातीचे आयुष्य खूपच खडतर होते. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात तिला आणि तिच्या कुटुंबाला संघर्षाचा सामना करावा लागला.
आशना श्रॉफचे इन्स्टावर दहा लाखांहून अधिक आणि यूट्यूबवर सुमारे दोन लाख फॉलोअर्स आहेत. यूट्यूबवर तिचे लक्ष फॅशन व्लॉगवर आहे. तसेच आशना द स्नॉब होमची मालकीण आहे. त्यांचा हा ऑनलाइन होम डेकोर ब्रँड घराच्या सजावटीवर काम करतो. याशिवाय आशनाने देशातील काही मोठ्या ब्रँड्सशी भागीदारी केली आहे. यामध्ये तरुण ताहिलियानी, मनीष मल्होत्रा, जेजे वलया यांच्यासह अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. याच जोरावर तिने इंडस्ट्रीत पटकन आपले स्थान निर्माण केले आणि आज ती करोडो रुपयांची मालकीण आहे. तिच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयाृ.
यशाची वेगवेगळी उंची गाठूनही आशना आपल्या संघर्षाचे दिवस विसरलेली नाही. वाईट दिवस मागे सोडून ती आज करोडो रुपयांच्या संपत्तीची मालकीण कशी बनली? हे तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.
आशनाने मुंबईतून आपले सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर इंटिरियर डिझायनिंगचा कोर्सही केला आहे. तिचे सुरुवातीचे जीवन खूप कठीण होते. माझ्या आईने वडिलांसोबत झालेल्या घटस्फोटानंतर खडतर परिस्थितीत आमचा संभाळ केला. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आम्हाला आजी-आजोबा आणि काकूंनी मदत केल्याचे तिने सांगितले. रणवीर अल्लाबदियाला दिलेल्या एका मुलाखतीत ती बोलत होती.
एकेकाळी त्यांच्या कुटुंबाला मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागले होते. एकेकाळी माझ्या कुटुंबाला अवघ्या 1500 रुपयांमध्ये खर्च चालवायला लागायचा. तहा काळ आमच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता, असे आशनाने सांगितले. आशनाने इंटेरिअर डिझाइन आणि फॅशनचा अभ्यास करताना तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करायला सुरुवात केली. लवकरच या फोटोसना सोशल मीडियावर लोकांची पसंती मिळू लागली.
आशनाने आपल्या करिअरची सुरुवात शिक्षक म्हणून केली. काही दिवसांनंतर, तिने नोकरी सोडली आणि द स्नॉब होम नावाचे ऑनलाइन फॅशन स्टोअर उघडले. 2016 मध्ये तिच्या स्टार्टअपला प्रचंड यश मिळाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज आशना श्रॉफ 37 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालकीण आहे.