SRK च्या अडचणी वाढल्या? "लाच देऊ केल्याने शाहरुखलाही..."; समीर वानखेडेंचा हायकोर्टात अर्ज

SRK Must Be Made Accused: आर्यन खान प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांविरोधातील प्रकरणाची सुनावणी सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरु असून या प्रकरणामध्ये शाहरुख खानच्या अडचणी वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 7, 2023, 10:31 AM IST
SRK च्या अडचणी वाढल्या? "लाच देऊ केल्याने शाहरुखलाही..."; समीर वानखेडेंचा हायकोर्टात अर्ज title=
मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरु आहे सुनावणी

SRK Must Be Made Accused: ऑक्टोबर 2021 मध्ये बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानसहीत (Aryan Khan) अनेकांना अंमली पदार्थ प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. एका पार्टीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापेमारी करत ही करावाई केली होती. त्यानंतर 3 आठवड्यांनी आर्यन खानला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या प्रकरणामध्ये कारवाईची सूत्र एनसीबी मुंबईचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. 

शाहरुखविरोधातही कायदेशीर कारवाईची मागणी

आर्यन खान प्रकरण प्रसारमाध्यमांच्या नजरेतून दूर गेल्यानंतर अनेक महिन्यांनी हे प्रकरण एनसीबीच्या स्पेशल टीमकडे सोपवण्यात आलं ज्यांनी चार्टशीट दाखल केली. पुरावे उपलब्ध नसल्याने या चार्जशीटमध्ये आर्यन खानच्या नावाचा उल्लेख आरोपींच्या यादीत नव्हता. त्यामुळेच भारतीय नार्कोटीक्स ब्युरोने या प्रकरणात आणखीन एका विशेष टीमची स्थापना केली. या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांविरोधात नार्कोटीक्स ब्युरोनेच तपास सुरु केला. त्यावेळी मुंबई झोनचे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंविरोधात आर्यनच्या सुटकेसाठी पैसे मागितल्याचा ठपका ठेवण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी सध्या न्यायालयामध्ये सुरु आहे. बुधवारी याच प्रकरणात झालेल्या सुनावणीदरम्यान समीर वानखेडेंना त्यांनी केलेल्या अर्जमध्ये बदल करण्याची मुभा देण्यात आली. वानखेडेंनी केलेल्या बदलामुळे शाहरुख अडचणीत येण्याची शक्यता आहे. समीर वानखेडेंनी आपली बाजू मांडता आणि स्वत:च्या बचाव करताना, "या प्रकरणात लाच देणाऱ्या पक्षावरही म्हणजेच शाहरुख खानविरोधातही कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली पाहिजे" अशी मागणी केली आहे.

25 कोटींची मागणी

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान प्रकरणामध्ये तपास करताना समीर आणि त्यांच्याबरोबरच काही सहकाऱ्यांनी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची मागणी केली होती. या अंमली पदार्थ प्रकरणामध्ये आर्यनला अडकवू नये यासाठी हे पैसे मागण्यात आले होते. भारतीय कायद्यानुसार लाचलुचपतविरोधी कायद्यानुसार समीर वानखेडे आणि इतर सहकाऱ्यांविरोधात पैसे वसूल करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी कट रचण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी 20 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात पार पडणार आहे. 

खान कुटुंब याबद्दल बोललं नाही

शाहरुख खानने आर्यन खान प्रकरणाबद्दल प्रसारमाध्यमांसमोर किंवा सार्वजनिकरित्या कधीच भाष्य केलेलं नाही. शाहरुखचा निकटवर्तीय मित्र विवेक वासवानी यांनी कनेक्ट एफएम कॅनडाला दिलेल्या मुलाखतीमध्ये "मला नाही वाटत त्यांना हा विषय पुढे वाढवायचा आहे. तो याबद्दल काहीच बोलला नाही. आर्यन, सुहाना किंवा गौरीही काहीच बोलले नाहीत. याला ग्रेस आणि डिग्नीटी असं म्हणतात," असं विधान केलेलं.

पठाण चित्रपटाच्या एका पत्रकार परिषदेमध्ये शाहरुखने, "हा अनुभव आम्हाला अजूनही सतावत आहे. या प्रकरणामध्ये आम्ही नक्कीच देवाचे अधिक आभारी नक्कीच आहोत. त्यावेळी आम्हाला लोकांना चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी कॉल करुन विनंती करावी लागली होती. मला माझे चित्रपट प्रेमाने प्रदर्शित व्हावे असं कायमच वाटतं," असं म्हटलं होतं.