'श्रीदेवी'च्या भूमिकेतील 'विंक गर्ल'ला फॅन्सनं केलं 'डिसलाईक'

फॅन्सनं सोशल मीडियावरून सिनेनिर्माते आणि प्रियावर या सिनेमावरून टीका केलीय

Updated: Jan 16, 2019, 11:50 AM IST
'श्रीदेवी'च्या भूमिकेतील 'विंक गर्ल'ला फॅन्सनं केलं 'डिसलाईक' title=

मुंबई : गेल्या वर्षी केवळ डोळा मारणाऱ्या एका व्हिडिओतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली 'विंक गर्ल' प्रिया प्रकाश वॉरिअर पुन्हा एकदा चर्चेत आलीय. प्रिया लवकरच 'श्रीदेवी बंगलो' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय... पण तिच्या या पदार्पणाला वादाचं ग्रहण लागलंय. या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक फॅन्सनं प्रियाला 'डिसलाईक' केलंय. 

'श्रीदेवी बंगलो' या सिनेमाच्या टीझरमधल्या शेवटच्या दृश्यात सिनेमातल्या अभिनेत्रीचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचं दाखवण्यात आलंय. श्रीदेवी यांच्या नावाशी आणि मृत्यूच्या दुर्घटनेशी साधर्म्य असल्यानं हा सिनेमा दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आयुष्यावर आधारीत असल्याची चर्चा सुरू झालीय. इतकंच नाही तर  सिनेनिर्माते आणि श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी या सिनेमाला कायदेशीर नोटीस धाडलीय.

फॅन्सनीही सोशल मीडियावरून सिनेनिर्माते आणि प्रियावर या सिनेमावरून टीका केलीय. दिवंगत व्यक्तीच्या नावाचा वापर करत चुकीच्या पद्धतीनं काही दृश्यं लोकांसमोर मांडण्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. तर काहींनी सिनेनिर्माते एखाद्या दिवंगत सेलिब्रिटीची खिल्ली कसे उडवू शकतात? असाही प्रश्न विचारलाय. 

तर कुणी त्यांना या सिनेमावरून दिवंगत अभिनेत्रीच्या पतीला, मुलींना आणि कुटुंबीयांना काय वाटेल, याचा कधी विचार केला का? असं म्हणत जाबही विचारलाय. 

तर हा सिनेमा एक सस्पेन्स थ्रीलर आहे तसंच श्रीदेवी हे सामान्य नाव आहे, असा दावा या सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत माम्बुली यांनी केलाय.