B`day Special : वयाच्या सहाव्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा अभिनेता माहितीये?

वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्याने कलाविश्वात पाऊल ठेवलं...   

Updated: Nov 7, 2019, 11:04 AM IST
B`day Special : वयाच्या सहाव्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा अभिनेता माहितीये?  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : अभिनय, लेखन, चित्रपट निर्मिती अशा विविध क्षेत्रांमध्येय योगदान देत कवालिश्वात एक वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या कलाकारांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे कमल हसन. वयाच्या ६५व्या वर्षीसुद्धा अभिनयावर असणारी त्यांची पकड ही प्रशंसनीय. अभिनयाकडून राजकारणाकडे वळणारा हा चेहरा बऱ्याच मुद्द्यांवर त्यांच्या ठाम मतांसाठीसुद्धा ओळखला जातो. 

हसन आज ज्या ठिकाणी आहेत तिथपर्यंत, त्या यशशिखरापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने स्वप्नांचा पाठलाग केला. त्यांच्यासाठी हे स्वप्न पाहिलं होतं ते म्हणजे त्यांच्या वडिलांनी. याच स्वप्नाच्या बळावर हसन यांनी वयाच्या सहाव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 

सहाव्याच वर्षी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार 

बालकलाकार म्हणून वयाच्या सहाव्या वर्षी ए. भीमसिंह दिग्दर्शित 'कलत्तूर कन्नम्मा' या चित्रपटातून त्यांनी कलाविश्वात पहिलं पाऊल ठेवलं. .या चित्रपटातून त्यांना अभिनेत्री रेखा यांचे वडील, जेमिनी गणेशन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. याच चित्रपटासाठी कमल हसन यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. या चित्रपटाच्या वाट्य़ाला आलेल्या यशानंतर त्यांनी शिवाजी गणेशन आणि एमजी रामचंद्र यांसारख्या अनेक नावाजलेल्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. 

कमल हसन यांच्या कारकिर्दीत त्यांच्या अनेक कलाकृती चाहत्यांच्या मनावर विशेष राज्य करुन गेल्या. भारतीय कलाविश्वात बऱ्याच नवोदित कलाकारांसाठी हसन आदर्शस्थानी. त्यांच्या याच कलाकृतींमध्ये काहींचा उल्लेख करायचा झाल्यास 'पुष्पक', 'एक दुजे के लिए', 'सदमा', 'इंडियन' आणि 'चाची ४२०' अशा चित्रपटांची नावं समोर येतात. याशिवायही त्यांनी हिंदी, तामिळ अशा विविधभाषी चित्रपटांमध्येही काम करत प्रत्येक वेळी प्रेक्षकांना थक्क केलं.