अटलांटा : मिस साऊथ आफ्रिका Zozibini Tunzi हिला यंदाच्या मिस युनिव्हर्स २०१९ Miss Universe 2019 या किताबाने गौरवण्यात आलं आहे. ती मुळची दक्षिण आफ्रिकेतील त्सोलो येथील रहिवासी आहे. जॉर्जिया, अटलांटा येथे पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात तिच्या डोक्यावर Miss Universe 2019चा मुकूट ठेवण्यात आला. ८ डिसेंबर २०१९ला हा सोहळा पार पडला.
२६ वर्षीय Tunziने मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या ६८व्या पर्वात ही बाजी मारली. स्वीमसुट आणि गाऊन अशा दोन फेऱ्यांनंतर परिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची तिने मोठ्या आत्मविश्वासाने उत्तरं दिली याच बळावर तिची या बहुमानासाठी निवड करण्यात आली. काही सामाजिक मुद्दे आणि तिचीच निवड योग्य का आहे, अशा आशयाचे प्रश्न तिला विचारण्यात आले होते. 'मी एका अशा विश्वात वाढले आहे, जेथे माझ्यासारख्याच महिला आहेत. माझ्यासारखा (सावळा) वर्ण असणाऱ्या, माझ्याप्रमाणे केस असणाऱ्या. अशा महिला, ज्यांचं सौंदर्य कधीच गणलं गेलं नाही', असं ती तिच्या शेवटच्या उत्तरात म्हणाली. आता चित्र बदललं आहे. हे सारं थांबण्याची हीच वेळ आहे. लहान मुलांनी माझ्याकडे पाहावं आणि त्यांचं प्रतिबिंब माझ्याच पाहावं असंच मला वाटलं, असं Tunzi म्हणाली.
Your new Miss Universe!!!! #MissUniverse2019 pic.twitter.com/vqcZXjY7Zg
— Miss Universe (@MissUniverse) December 9, 2019
एकिकडे Tunziने या स्पर्धेत बाजी मारली असतानाच मिस मेक्सिको आणि मिस प्युर्तो रितो यांना या स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. दरम्यान, मिस युनिव्हर्स स्पर्धोच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार लिंगभेद, हिंसाचार यांच्याविरोधात लढा देण्याच्या बऱ्याच मोहिमा आणि उपक्रमांमध्ये Tunziचा सहभाग असतो. नैसर्गिक सौंदर्याची प्रणेती असणारी Tunzi कायमच महिलांना त्या जशा आहेत तसंच स्वत:चा स्वीकार करत स्वत:वर प्रेम करण्यासाठी प्रेरित करत असते.
भारताच्या वर्तिकाच्या वाट्याला अपयश
भारताकडून या स्पर्धेत सहभागी झालेल्या वर्तिका सिंह हिला अंतिम फेरीपर्यंज मजल मारता आली नाही. अंतिम दहा स्पर्धकांमध्ये मिस अमेरिका, मिस कोलंबिया, मिस प्युर्तो रिको, मिस साऊथ आफ्रिका, मिस पेरू, मिस आयलंड, मिस फ्रान्स, मिस इंडोनेशिया, मिस थायलंड आणि मिस मेक्सिको यांचा सहभाग होता.