मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत घटस्फोटानंतर पुन्हा एकदा बोहल्यावर चढतेय. मिळालेल्या माहितीनुसार, सौंदर्या व्यावसायिक आणि अभिनेता विशनगन वनानगामुडी याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सौंदर्या आणि विशनगन यांचा विवाह ११ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलाय.
'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. संगीत आणि मेहंदीची सुरुवात ९ फेब्रुवारी होईल. याशिवाय लग्नापूर्वी रजनीकांत यांच्या घरी पूजाही होणार आहे. या विवाह सोहळ्यानंतर शानदार रिसेप्शन पार्ट्यांचंही आयोजन करण्यात येणार आहे. पहिली पार्टी रजनीकांत यांची पत्नी लता रजनीकांत देणार आहेत. तर दुसरी पार्टी रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्या देणार आहे.
गेल्या वर्षी सौंदर्या आणि विशनगन यांचा साखरपुडा पार पडला होता. यामध्ये कुटुंबातील खास सदस्य सहभागी झाले होते.
विशनगन वनानगामुडी एका फार्मास्युटिकल कंपनीचा मालक आहे. त्यानंही सिनेमांत अभिनय करून आपलं नशिब आजमावलंय. उल्लेखनीय म्हणजे, विशनगन याचाही हा दुसरा विवाह आहे. यापूर्वी त्याचा विवाह एका मॅगझीनची संपादिका कनिका कुमारन हिच्याशी झाला होता.
सौंदर्या हिचा पहिला विवाह उद्योगपती अश्विन रामकुमार यांच्याशी झाला होता. विवाहानंतर सात वर्षांनी २०१७ साली या दोघांचे मार्ग वेगळे झाले. सौंदर्या आणि अश्विन यांना तीन वर्षांची एक मुलगीही आहे... तीचं नाव वेद कृष्णा आहे.