मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे आज निधन झाले. मराठी सिनेमासृष्टीमध्ये चार दशकांहून अधिक काळ विविधरंगी भूमिका करून रसिकांना खदखदून हसायला लावणारा एक चतुरस्त्र नट आपल्यातून हरवला. हा कलाकार मराठी सिनेसृष्टीत येण्यापूर्वी रंगभूमीवर विविध नाटकांमधून रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. मराठी रंगभूमी, छोटा पडदा किंवा मोठ्या पडद्यावरील प्रत्येक भूमिका करताना त्याला न्याय दिला.
कलाकारांसोबत काम करताना सहाय्यक कलाकार म्हणून वेगळी छाप पाडणारे विजय चव्हाण सगळ्यांच्या लक्षात राहत. विजय चव्हाण यांनी 'तू सुखकर्ता', 'झिलग्यांची खोली', 'सगळे सभ्य पुरूष', 'सासरेबुवा जरा जपून' यासारख्या नाटकांत वेगळ्या भूमिका केल्या.
पण 'मोरूची मावशी' नाटकात साकारलेली मावशी ही आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिली. उंच बांधा, रांगड व्यक्तिमत्व असलेला हा कलाकार जेव्हा साडी नेसून रंगमंचावर उभा राहतो तेव्हा तो तितकाच नाजूक वाटतो हे त्यांचे वेगळेपण. रंगभूमीनंतर त्यांनी सिनेसृष्टीतही आपलं वेगळपण दाखवलं. 1985 साली त्यांनी 'वहिनीची माया' हा सिनेमा मिळाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर 'घोळात घोळ', 'धुमाकूळ', 'बलिदान', 'शेम टू शेम', ''माहेरची साडी'' यासारख्या वेगवेगळ्या सिनेमांतून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मात्र त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली ती महेश कोठारे यांच्या शुभमंगल सावधान. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे विनोदी नट असताना सहाय्यक कलाकार ही तेवढा दमदार असावा यासाठी विजय चव्हाण यांची निवड झाली. महेश कोठारे यांच्या प्रत्येक सिनेमाचा भाग बनले. तसेच विजय चव्हाण यांची 'कान्होळे' ही भूमिका अतिशय आवडली.
विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण हा देखील सिनेमासृष्टीत आहे. आपल्या नावाचा वापर न करता आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर त्याने काम करावं यासाठी विजय चव्हाण आग्रही होते.