मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. सातारा येथील फलटण तालुक्यात 'माझी आई काळूबाई' या मालिकेच्या शुटिंग दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. १६ सप्टेंबर रोजी त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
गेल्या महिन्याभरापासून या मालिकेचं शुटिंग सुरू आहे. आशालता वाबगावकर यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याचं समजतं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील मिळाली आहे. सेटवर काही जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर साऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आशालता वाबगावकर यांचा देखील समावेश होता.
सोनी मराठीवर 'माझी आई काळुबाई' ही मालिका लागते. या मालिकेत काळूबाईची भूमिका अलका कुबल यांनी साकारली आहे. अलका कुबल यादेखील सेटवर होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. गेल्या महिन्याभरापासून साताऱ्यातील फलटण तालुक्यात या मालिकेचं चित्रीकरण सुरु होतं.
आशालता यांच्यासह सेटवरील अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. आशालता यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास सेटवरील २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे तात्काळ शुटिंग थांबवण्यात आली आहे.