तृप्ती गायकवाड,झी मीडिया मुंबई : क्रिकेट आणि सिनेमा हा भारतीयांच्या कायमच जवळचा विषय आहे. चित्रपट सृष्टीमुळे आजवर अनेक मोठे दिग्गज या भारताला लाभले. यातील एक नाव म्हणजे दिग्दर्शक सत्यजित रे. शशी कपूर, राजेश खन्ना यांचे स्वप्ननगरीमध्ये घेऊन जाणाऱ्या सिनेमांमध्ये सत्यजित रे यांचे समांतर सिनेमे जगासमोर वास्तव मांडत होते. त्यामुळे समांतर सिनेमा आणि सत्यजित रे हे समीकरण होत गेलं.
सत्यजीत यांच्या घरातच कलेचा वारसा होता. त्यांचे वडील आणि आजोबा हे लेखक, कवी आणि चित्रकार होते. कलेचा हाच वारसा सत्यजित यांनी पुढे नेला. यशस्वी दिग्दर्शक असण्याबरोबर सत्यजित हे लेखक आणि कालिग्राफर देखील होते. सिनेमा हा समाजाचा आरसा असतो हे त्यांच्या सिनेमातून कायमच दिसून येत आलं. पाथेर पांचाली, अपराजीतो, देवी, यांसारखे हिट सिनेमे सत्यजीत यांच्या नावावर आहे. समांतर सिनेमामध्ये सत्यजित रे यांचा हातखंड होता. बंगालमधील छोट्याश्या गावात राहणाऱ्या अपूची गोष्ट सांगणाऱ्या पाथेर पांचाली या सिनेमाने सत्यजित रे नावाचं रत्न भारतीय सिनेमा सृष्टीला दिलं.
पाथेर पंचालीने जगभरातील अनेक नामांकित पुरस्कार पटकावले. सत्यजीत नेहमीच त्यांच्या सिनेमातील स्त्री भुमिकांचा सखोल विचार करत असे. त्यांच्या सिनेमातील नायिका कायमच अभ्यासण्याचा विषय असतो असं जाणकार सांगतात. पाथेर पांचाली साकारताना सत्यजीत यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. या सिनेमासाठी त्यांनी पत्नीचे दागिने गहाण ठेवले होते. सिनेमाचं कथानक आणि दिग्दर्शन हे इतकं भारदस्त असल्याने त्यांच्या या पहिल्या वहिल्या सिनेमाने जगाला दखल घेण्यास भाग पाडलं.
सिनेमा विषयक ज्ञान मिळवण्यासाठी आजही जागतिक पातळीवर सत्यजित यांचे सिनेमे अभ्यासक्रमात अभ्यासले जातात. भारतीय समांतर सिनेमे आंतराष्ट्रीय पातळीवर नेण्यात सत्यजित यांचा मोलाचा वाटा आहे. 1992 मध्ये सत्यजित यांना ऑस्कर प्रदान करण्यात आला मात्र शरीर साथ देत नसल्याने ऑस्करने त्यांच्या घरी जाऊन पुरस्कार प्रदान केला. पुरस्कार प्रदान करताना सत्यजित यांची एक अट होती. हॉलिवूड ऑड्री हेपबर्न हिच्या हातून पुरस्कार स्वीकारण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यांच्या इच्छेचा मान राखत ऑड्रीने जीवनगौरव पुरस्कार त्यांना बहाल केला. सिनेमाच्या माध्यमातून भारतीय सांस्कृती मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या या दिग्दर्शकाला भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले होते.