Satish Kaushik Death: 'कॅलेण्डर.... खाना दो' असं म्हटलं की लगेचच चेहऱ्यासमोर एक चेहरा उभा राहतो. हा चेहरा म्हणजे सतीश कौशिक (Satish Kaushik as Calander) यांचा. अभिनयाच्या बळावर सहायक भूमिका का असेना पण प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा हा एक हरहुन्नरी अभिनेता. नुकतंच कौशिक यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं आणि चाहत्यांसह बॉलिवूडकरांच्याही (Bollywood) मनात कालवाकालव झाली. कालपरवापर्यंत आपल्यासोबत वावरणारा हा चेहरा यापुढं कधीच आपल्यासोबत नसेल या जाणिवेनं अनेकांच्याच डोळ्यात अश्रू तरळले. अशा या अभिनेत्याच्या खासगी आयुष्यातील कैक आठवणींना सध्या पुन्हा एकदा उजाळा देण्यात येत आहे.
सतीश कौशिक कलेप्रती कायमच समर्पक आणि एककेंद्री होते. सिनेजगतासाठी जणू त्यांनी स्वत:ला झोकूनच दिलं होतं. इतकंच नव्हे, तर एक व्यक्ती म्हणूनही त्यांनी अनेकांच्याच मनात मानाचं स्थान मिळवलं होतं. जे यापुढेही कायम असेल. खासगी आयुष्यामुळंही त्यांचं नाव कायमच चर्चेत राहिलं. हिंदी कलाजगतातील चौकटींना शह देणाऱ्या अभिनेत्री (Neena Gupta) नीना गुप्ता यांच्या 'सच कहूं तो' या आत्मचरित्रपर पुस्तकातूनही कौशिक यांचं एक वेगळं रुप जगासमोर आलं.
गुप्ता यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितल्यानुसार त्यावेळी नीना गुप्ता वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांच्यापासून गरोदर होत्या. तेव्हाच कौशिक यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली होती. नीना यांच्या बाळाचे वडील म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. नीना यांना ते म्हणाले होते, 'तू चिंता करु नको. मूल सावळं असेल, तर तू सांग की ते माझं मूल आहे. आपण दोघं लग्न करु. कोणालाही कशाचाच संशय येणार नाही.'
नीना आणि लग्नाची मागणी या वक्तव्याच्या अवतीभोवती फिरणाऱ्या बऱ्याच चर्चाही झाल्या, ज्यानंतर खुद्द कौशिक यांनी यामागचं कारणही स्पष्ट केलं होतं. लग्न न करता एका बाळाचं संगोपन करणं ही मोठी बाब असून, मी नीनाचं कौतुक करतो असं ते एका मुलाखतीदरम्यान म्हणाले होते. एक चांगला मित्र म्हणून मी त्यावेळी तिला साथ देऊ इच्छित होतो, असं सांगत त्यांनी आपल्या नात्याती मैत्री अधोरेखित केली. नीना यांनी पुस्तकात केलेला तो उल्लेख म्हणजे एकप्रकारचा भावच आहे असंही ते म्हणाले होते.
विवियन रिचर्ड्स यांच्याशी लग्न न करता या नात्यातून बाळाची जबाबदारी घेणाऱ्या नीना त्या दिवसांमध्ये एकट्या पडल्या होत्या. त्यामुळं त्यांचा गमावलेला आत्मविश्वास परत आणण्यासाठीच सतीश कौशिक प्रयत्न करत होते. नीनाला लग्नाची मागणी घातली तेव्हा त्यात विनोदी अंदाज, चांगल्या मैत्रीणीप्रतीचा आदर अशाच एकंदर भावना आपल्या मनातच होत्या. गरज होती त्यावेळी त्यांनी नीना यांना धीर दिला होता. असं होतं हे कलाजगतातील एका खास कलाकार जोडीच्या निखळ मैत्रीचं नातं.... आता उरल्या फक्त आठवणी!