Satish Kaushik Death 15 Crore Connetion: बॉलिवूडमधील अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या मृत्यू प्रकरणाला (Satish Kaushik Death Case) नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. अशी शक्यता व्यक्त करण्यामागील कारण म्हणजे दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) सुरु केलेला एक प्रयत्न. दिल्ली पोलिसांना विकास मालूच्या (Vikash Malu) पत्नीचा जबाब नोंदवायचा असून त्यांना या महिलेची चौकशीही करायची आहे. कुबेर ग्रुपचे मालिक असलेले विकास मालू यांच्या पत्नीने काही गंभीर आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता चौकशीसंदर्भातील परवानगी मिळवण्यासाठी हलचाल सुरु केली आहे. विकासने सतीश कौशिक यांच्याकडून उद्योगासंदर्भात 15 कोटी रुपये घेतले होते. मात्र पैसे परत देता येत नव्हते म्हणून कट रचून विकासने त्यांना चुकीची औषधाची गोळी दिल्याचा धक्कादायक आरोप विकास यांच्या पत्नीने केला आहे.
दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सतीश कौशिक यांच्या मृत्यूसंदर्भातील आतापर्यंतच्या तपासामध्ये कोणतीही संक्षयास्पद गोष्ट आढळून आलेली नाही. तसेच कौशिक यांच्या कुटुंबानेही यासंदर्भातील कोणतीही शंका घेतलेली नाही. आता दिल्ली पोलिस या प्रकरणामध्ये विकास मालूच्या पत्नीला नोटिस पाठवणार आहे. पोलिसांना विकास मालूच्या पत्नीचा जबाब नोंदवण्याबरोबरच तिची चौकशीही करायची आहे. दिल्ली पोलिसांनी विकास मालूच्या पत्नीला विचारण्यासाठी प्रश्नांची एक लांबलचक यादीच तयार केली आहे.
सतीश कौशिक मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांना कोणतीही संक्षयास्पद गोष्ट आढळून आलेली नसली तरी पोलिस सर्व दृष्टीकोनाने तपास करत आहेत. या प्रकरणाशी संबंधित कोणताही तपशील आपल्या नजरेतून सुटता कामा नये असा पोलिसांचा प्रयत्न असून ते सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. आतापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत मात्र त्यात काहीही संशय घेण्यासारखं आढळून आलेलं नाही. तक्रारीमध्ये दाऊदशी विकास मालूचे संबंध असल्याची चर्चा पोलिस दलात आहे. या अंगानेही पोलिस सध्या तपास करत आहेत.
दरम्यान, सतीश कौशिक यांची पत्नी शशी यांनीही आपला जबाब नोंदवला आहे. सतीश कौशिक यांच्या पत्नीने विकास आणि सतीश हे चांगले मित्र होते असं म्हटलं आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता. तसेच शशी कौशिक यांनी विकास मालूने सतीश यांच्याकडून 15 कोटी रुपये घेतल्याचा दावाही खोडून काढला आहे. विकास मालू 'फार श्रीमंत' आहे. त्याला पैसे मागण्याची गरज नाही, असं शशी यांनी या 15 कोटींसंदर्भातील आरोपांबद्दल म्हटलं आहे.