मुंबई : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये प्रचंड प्रसिद्धी, बक्कळ पैसा आणि मोठे प्रोजेक्ट हाताशी घेऊन पुढे जाणारा अभिनेता महेश बाबू गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. महेश बाबूनं त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात फार आधीपासूनच केली. पाहता पाहता त्यानं प्रेक्षकांच्या मनात भक्कम स्थान निर्माण केलं. पण, या साऱ्यामध्ये हल्लीच त्यानं असं वक्तव्य केलं की, पाहणारेही हैराण झाले. (mahesh babu controversial statment )
हिंदी कलाजगताविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेता महेश बाबू आता मात्र तोंडावर पडला आहे. कारण, ‘सरकारु वारी पाटा’ या त्याच्या चित्रपटाची वाईट अवस्था झाली आहे.
दणक्यात ओपनिंग मिळालेल्या या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी गटांगळ्या खाण्यास सुरुवात केली. ज्यामुळं आता आपणही हिंदी चित्रपट करण्यास तयार असल्याचा इशाराच महेश बाबूनं दिला आहे.
‘मेजर’ च्या ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान या अभिनेत्यानं स्वत:च पायावर धोंडा मारून गेत हिंदी कलाजगताला मी परवडणार नाही असं म्हटलं आणि एक नवं वादंग माजलं. पण, आपण हे मस्करीत बोललो अशी सारवासारव आता तो करताना दिसत आहे.
दरम्यान, तिथे नव्या चित्रटानं श्वास सोडण्यास सुरुवात केलेली असतानाच आता आपल्या चुकीची जाणीव महेश बाबूला झाली असंच दिसत आहे. कारण सूत्रांच्या माहितीनुसार हिंदी चित्रपटांशी माझं काहीच वैर नाही आणि मी त्या चित्रपटांमध्येही काम करण्यासाठी तयार असल्याचं तो म्हणाला आहे.
आता मुद्दा असा, की इथं या दाक्षिणात्य अभिनेत्याच्या वक्तव्यानं बी- टाऊन कलाकारांच्याही भावना दुखावल्या. ज्यामुळं येत्या कालात त्याला हिंदी सिनेजगतामध्ये स्थान मिळतं का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल.