‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेने जवळपास तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या मालिकेमुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. या कुटुंबातील मोरे कुटुंबाने सर्वांचीच मनं जिंकून घेतली. याच मालिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणून साक्षी गांधीला ओळखले जाते. साक्षीने या मालिकेत अवनी हे पात्र साकारले होते. आता नुकतंच साक्षीने तिच्या आई-वडिलांच्या आठवणीत भावूक पोस्ट शेअर केली आहे.
साक्षी ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. ती विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. नुकतंच साक्षीने तिच्या कुटुंबासोबतच काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचे आई, बाबा आणि बहिण दिसत आहे. यात ती फारच आंनदात पाहायला मिळत आहे. साक्षीने ही पोस्ट शेअर करताना तिला आई-वडिलांची आठवण येत असल्याची खंत बोलून दाखवली आहे.
मुलं मोठी झाली की करिअर करण्यासाठी बाहेर पडतात .. आपल्या family पासून दूर राहतात. महिनोंमहिने भेट नाही , पाहणं नाही.. फक्त काय ते call वर आवाज ऐकणं.. ७ वर्ष झाली चिपळूण सोडून मुंबईत आले.. घरच्यांपासून दूर.. खूप मोठ्ठ व्हायचं असतं, पैसे कमवायचे असतात, सगळ्या ईच्छा पूर्ण करायच्या असतात.. का ???? तर आयुष्यात setlled व्हायचंय .. निवांत व्हायचं आहे.. पण खरचं आपण होतो का कधी पूर्णपणे settled …??????? कामासाठी इतके धावत आपण असतो की अनेक दिवस एखादा २ मिनिटांचा कॉल सुद्धा घरी होत नाही. नसेल का होत आई वडिलांच्या जिवाची घालमेल ??? त्यांना रात्र रात्र झोप लागत असेल का ? एखादा चमचमीत पदार्थ उतरत असेल का त्यांच्या घशाखाली ???
कधीतरी त्रास होतो या विचारानी .. पण सहज उठून जाताही येत नाही … तेंव्हा भासते घराची ओढ… आई पप्पा क्षितू …खूप दिवस झाले पाहिलं नाहीये तुम्हाला ….. पण भेटू लवकरच ( घरच्यांना सुद्धा भेटू लवकरच .. हे म्हणावं लागतंय ), असे तिने यात म्हटले आहे. त्याबरोबरच तिने मिसिंग यू अ लॉट असा हॅशटॅगही पोस्ट केला आहे.
साक्षीच्या या पोस्टवर छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. तिच्या या पोस्टवर अभिनेत्री विदिशा म्हस्करने मी तुझ्या भावना समजू शकते, अशी कमेंट केली आहे. तर श्रद्धा नलिंदेने खूप सारं प्रेम बबडी, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अभिनेत्री रेश्मा शिंदेने हार्ट इमोजी पोस्ट करत यावर कमेंट केली आहे.
दरम्यान साक्षी गांधीने आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'मन उधाण वाऱ्याचे', 'हिरकणी', 'वसियत', 'हाजेरी', 'भाडखाऊ', 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत झळकली. या मालिकेत तिने अवनी हे पात्र साकारलं होतं. या मालिकेद्वारे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत ती एका श्रीमंत घरात वाढलेली मुलगी असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यानंतर मग ती एका सर्वसामान्य कुटुंबात येऊन कशाप्रकारे कुटुंबात मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करते, हे दाखवण्यात आले होते.