मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी ‘हसीना पारकर’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये चांगलीच बिझी आहे. श्रद्धा ही प्रभाससोबत ‘साहो’मध्ये बघायला मिळणार आहे.
‘साहो’ या सिनेमाचीही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे नुकतीच श्रद्धाने प्रभासची भेट घेतली असून ही भेट कशी होती, याचा खुलासा तिने एका वेबसाईटकडे केला आहे. श्रध्दाने सांगितले की, ‘साहो’ हा सिनेमात माझ्यासाठी वेगवेगळ्या कारणांची खास आहे. त्यातील एक महत्वाचं कारण म्हणजे हा सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये तयार होतोय आणि अशा सिनेमात मी पहिल्यांदाच काम करतीये’.
श्रद्धा सांगते, ‘माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे की, ‘साहो’मध्ये मला प्रभाससोबत काम करण्याची संधी मिळत आहे. मी ‘साहो’साठी खूप उत्साहीत आहे. आम्ही हा सिनेमा २ भाषांमध्ये शूट करणार आहोत. दोन दिवसांपूर्वीच मी हैदराबादमध्ये होती. इथे मी आणि प्रभास पहिल्यांदाच भेटलो आणि आमचं स्क्रिप्ट रिडींग झालं. याच आठवड्यात आमचं शुटिंगही सुरू होणार आहे’.
ती पुढे सांगते की, ‘मी जेव्हा पहिल्यांदा प्रभासला भेटली तेव्हा मी त्याला सांगितले की, मी श्रद्धा आहे. तेव्हा त्याने दुसरं काहीही न बोलता त्याने मला विचारले की, तुला भूक लागली आहे काय? मी त्यावर म्हणाले, होय..मी नेहमीच भुकेलेली असते. त्यावरून माझ्या लक्षात आले की, आमच्या चांगलं जमणार आहे. कारण मलाही खाण्याचा खूप शौक आहे. त्याने मला त्याच्या घरचं स्वादिष्ट जेवण खाऊ घातलं. तो हेही म्हणाला की, जेव्हाही हैदराबादमध्ये असशील तेव्हा माझ्या घरून तुझ्यासाठी जेवण येईल. प्रभास खूपच चांगला माणूस आहे’.
‘लोक म्हणतात प्रभास कमी बोलतो. मला असे अजिबात वाटले नाही. मी त्याच्यासोबत केवळ दोनच दिवस होते. त्यात आमचं चांगलं कनेक्शन तयार झालं’.