नवी दिल्ली : संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा 'पद्मावत'मध्ये अभिनेता रणवीर सिंह यानं काळी बाजू असलेली 'अलाउद्दीन खिलजी'ची भूमिका इतक्या उत्कृष्टरित्या निभावली की त्याच्यासमोर इतर कलाकार पार झाकोळून गेले. याच भूमिकेसाठी रणवीर सिंहला यंदाच्या वर्षाचा उत्कृष्ट अभिनेता म्हणून 'दादासाहेब फाळके' पुरस्कार जाहीर झालाय.
ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'पद्मावत'नं बॉक्स ऑफिसवर ३०० करोडहून अधिक गल्ला गोळा केला होता. सिनेसमीक्षकांनीही या सिनेमाचं आणि विशेषत: रणवीरच्या भूमिकेचं तोंडभरून कौतुक केलं होतं. 'पद्मावत' या सिनेमात दीपिका पादूकोण आणि शाहिद कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रणवीरनं या सिनेमात एका क्रूर खलनायकाची भूमिका निभावली होती.
सिनेसृष्टीत विशेष योगदानासाठी दादासाहेब पुरस्कार दिला जातो. रणवीरशिवाय अनुष्का शर्मा हिलादेखील या पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे.
सध्या रणवीर आपल्या आगामी 'गली बॉय' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात त्याच्यासोबत आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे झोया अख्तर... यानंतर रणवीर रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' या सिनेमातही दिसणार आहे.