Shark Tank India: '1 कोटी हवे की 2? तू हवे तेवढे घे' म्हणत Peyush Bansal ने 'त्याला' दिला ब्लँक चेक

Peyush Bansal offers blank cheque in Shark Tank India: सगळ्याच 'शार्क्स'ने या उद्योगामध्ये रस दाखवत ऑफर दिल्या. यामध्ये दोन 'शार्क'ने स्वतंत्र तर दोघांनी संयुक्तपणे ऑफर दिली.

Updated: Jan 28, 2023, 06:52 PM IST
Shark Tank India: '1 कोटी हवे की 2? तू हवे तेवढे घे' म्हणत Peyush Bansal ने 'त्याला' दिला ब्लँक चेक title=
Peyush Bansal offers blank cheque in Shark Tank India

Peyush Bansal offers blank cheque in Shark Tank India: आपल्या स्टार्टअप कंपन्यांसाठी गुंतवणूक मिळवण्याच्या इच्छेने 'शार्क टँक इंडिया'च्या दुसऱ्या पर्वामध्ये (Shark Tank India Season 2) अनेक उद्योजक येत आहेत. यापैकी बऱ्याच उद्योजकांच्या कल्पना आणि ते करत असलेला बिझनेस थक्क करायला लावणारे आहेत. शार्ट टँक इंडियाच्या पुढील भागामध्ये अशाच एका उद्योजकाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या उद्योजकाचं नाव आहे, कल्पित पटेल! कल्पित (Kalpit Patel) हा एका इलेक्ट्रॉनिक बाईक ब्रॅण्डचा संस्थापक असून त्याने मांडलेली संकल्पना आणि प्रोडक्ट पाहून सर्व 'शार्क्स' म्हणजेच पियुष बन्सल (Peyush Bansal), अनुपम मित्तल (Anupam Mittal), नमिता थापर (Namita Thapar), विनिता सिंग (Vineeta Singh) आणि अमन गुप्ताही (Aman Gupta) फारच इम्प्रेस होतात.

या उद्योजकाने किती पैसे मागितलेले?

'शार्क टँक इंडिया-2' च्या नव्या प्रोमोमध्ये कल्पित 'शार्क्स'ला आपल्याला इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची इच्छा असल्याचं सांगतो. कल्पित आपल्या इलेक्ट्रीक गाडीचं वर्णन 'इजी आणि रोज वापरता येणारी कार' असं करतो. तो आपल्या या उद्योगामध्ये 'शार्क्स'ने गुंतवणूक करावी म्हणून एक टक्क्याच्या मालकी हक्कासाठी एक कोटी रुपयांची मागणी करतो.

50 पैसे प्रति किमी

कल्पितने आपल्या कंपनीबद्दल सांगितल्यानंतर पियुष बन्सल त्याला ही कार त्याने कशी बनवली याबद्दलची माहिती विचारली. त्यावर कल्पितने, "मी अनेक गॅरेजला भेट दिली. मी अनेक गाड्या उघडून पाहिल्या की त्यांच्या आतमध्ये नेमकं काय असतं," असं सांगितलं. त्यानंतर कल्पितने कशाप्रकारे त्याने तयार केलेली कार ही अ‍ॅपवर चालते याबद्दल तसेच कारमध्ये नसतानाही कशाप्रकारे ती हाताळू शकतो याबद्दल सांगितलं. यानंतर अमन गुप्ताने ही कार सीएनजी-कारपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होऊ शकते का? असा प्रश्न कल्पितला विचारला. "हो सर ही कार आठ आण्यांमध्ये (50 पैसे प्रति किलोमीटर अ‍ॅव्हरेजवर) चालेल," असं उत्तर कल्पित अगदी आत्मविश्वासाने देतो.

'शार्क्स'ने दिल्या या ऑफर

यानंतर पियुष आणि अनुपम कल्पितचं कौतुक करतात आणि त्याला ऑफर देतात. नमिता कल्पितला 70 लाखांच्या मोबदल्यात 5 टक्के मालकी द्यावी अशी ऑफर देते. त्यानंतर विनिता आणि अमन दोघे मिळून कल्पितला एक जॉइण्ट ऑफर देतात. 2.95 टक्के मालकीच्या मोबदल्यात 70 लाख रुपये देण्याची तयारी विनिता आणि अमन दाखवतात. अनुपम कल्पितला 1 टक्के मालकीसाठी 60 लाख देण्याची तयारी दर्शवतो. यापैकी कल्पिते नेमकी कोणती ऑफर घेतली हे स्पष्ट झालेलं नाही.

ओपन ऑफर

दुसऱ्या प्रोमोमध्ये सर्व 'शार्क' अन्य एका उद्योजकाला ओपन ऑफर देताना दिसतात. या प्रोमोच्या सुरुवातीला पियुष बन्सल, "तू इथे 50 लाखांसाठी आला आहेस. तुला 1 कोटी हवेत की 2 कोटी हवेत ते तू तुझ्या व्हॅल्यूएशनवर घे," असं सांगतात. यावर अमन, "यापूर्वी असं कधीही झालं नाही. लोक तुला खुली ऑफर देत आहेत," असं सांगतो. यानंतर पियुष कल्पितला ब्लँक चेक ऑफर करतो. मात्र ही ऑफर कोणत्या प्रोडक्ट अथवा कंपनीसाठी शार्ककडून दिली जाते हे प्रोमोममध्ये स्पष्टपणे दाखवण्यात आलेलं नाही. 

'शार्क टँक इंडिया'चे दुसरं पर्व सोनी टीव्ही आणि सोनीलाइव्हवर दाखवलं जात आहे.