Adnan Siddiqui Controversial Statement : पाकिस्तानी अभिनेता अदनान सिद्दीकी हा कायमच त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. अनेकदा तो वादग्रस्त विधान किंवा निर्मात्यांची खिल्ली उडवताना दिसतो. आता अदनान सिद्दीकी एका विधानामुळे वादात सापडला आहे. एका कार्यक्रमात अदनान सिद्दीकीने महिलांची तुलना माशींसोबत केली आहे. त्याच्या विधानावर वाद वाढल्यानंतर त्याने याबद्दल स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे.
अदनान सिद्दीकीने नुकतंच ARY वरील निदा यासिरच्या शान-ए-सुहूर या कार्यक्रमाच्या रमझान स्पेशल भागात हजेरी लावली. या टेलिव्हिजन कार्यक्रमात त्याने महिलांची तुलना थेट माशांसोबत केली. अदनान हा कार्यक्रमात बोलत असताना अचानक एक माशी आली आणि त्यांच्या हातावर बसली. यावर तो म्हणाला, "मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, पण इथे जितक्या महिला आहेत, त्यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नका. माशी आणि स्त्रिया या एकसारख्याच असतात. तुम्ही एखाद्या स्त्रीच्या मागे जितके पळाल, तितकी ती महिला तुमच्यापासून दूर जाते. पण जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी बसता, तेव्हा त्या स्वत:हून एखादी माशी बसल्याप्रमाणे तुमच्या हातावर येऊन बसतील", असे वक्तव्य अदनानने केले होते.
अदनानच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन अनेक जण अदनानला ट्रोल करताना दिसत आहे. अदनानच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. आता त्याने त्याच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे. त्याने याबद्दल इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.
"मी नुकतंच एका कार्यक्रमात केलेल्या विधानाबद्दल आता भाष्य करु इच्छितो. मी ते विधान मस्करीत केले होते. यामुळे माझा कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. माझ्या तोंडातून चुकून हे वाक्य निघून गेले. माझ्या वक्तव्याचा किती चुकीच्या पद्धतीने अर्थ लावला गेला असावा, याचा अंदाज मला आहे आणि जर मी अनवधानाने कोणाला दुखावले असेल तर मी खेद व्यक्त करतो. यापुढे मी कोणतेही वक्तव्य करताना निश्चितच काळजी घेईन", असे अदनानने म्हटले आहे.
दरम्यान अदनान सिद्दीकी हा पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अभिनेता आणि निर्माता म्हणून काम पाहिले आहे. मॉम या हिंदी चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सिरिअल एंटरटेनमेंट नावाचे त्याचे प्रोडक्शन हाऊस आहे. अदनानने आतापर्यंत अरोसा, पल दो पल, मेरी अधुरी मोहब्बत, छोटीसी कहानी, वासी, परसा यांसारख्या चित्रपटात काम केले.