मुंबई : झी मराठी वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’. या मालिकेतील जोडी राणादा आणि अंजली पाठक घराघरात जाऊन पोहोचलेय. एव्हढेच नाही तर लहान मुलांच्या तोंडी या जोडीची नावे असतात. ‘तुझ्यात जीव रंगला’चा झालेला वाद मिटलाय. त्यामुळे कोल्हापूरमधील वसगडे गावात शूटिंगदरम्यान पुन्हा अॅक्शन, ओके...कट हे पाहण्यासाठी गर्दी उसळत आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील गायकवाडांचा वाडा आता मालिकाप्रेमींसाठी पर्यटनस्थळच बनलाय. अनेकजण विकएण्डला आणि सुट्टीत वसगडे गावात जाताना दिसत आहे. त्यामुळे या गावात मोठी गर्दी होत आहे. तुमच्या आवडत्या कलाकारांना येथे भेटायचे असेलतर तुम्हाला वेळमर्यादा पाळावी लागणार आहे. तसे फर्मानच प्रॉडक्शन टीमने काढलेय.
होणाऱ्या गर्दीमुळे आणि शूटिंग पाहायला येणाऱ्यांमुळे वसगडे गावात पार्किंगचा प्रश्न एक समस्या झालेय. दरम्यान, ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर या मालिकेचे शूटिंग बंद करण्यात यावे, अशी नोटीस नुकतीच वसगडे ग्रामपंचायतीने निर्मात्यांना धाडली. या मालिकेवर शेकडो लोकांचे रोजगार अवलंबून असल्याने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मध्यस्थीनंतर पुन्हा एकदा या गावात आता ‘लाइट, कॅमेरा अॅण्ड अॅक्शन’चे सूर पाहायला मिळत आहे. मात्र, निर्मात्यांना यापुढे काही नियम, अटींचे पालन करावे लागणार आहे, अशी माहिती मिळतेय.
मालिकेच्या लोकप्रियता आणि चाहत्यांच्या प्रेम यामुळे शूटिंगच्या ब्रेकदरम्यान चाहत्यांची आणि कलाकारांची भेट मिळत होती. मात्र, यापुढे ठरावीक वेळेतच चाहत्यांना कलाकारांना भेटता येणार आहे. तसे फलकच आम्ही गावात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. यापुढे चाहत्यांना पार्किंगही गावाबाहेरच करावे लागणार आहे, प्रॉडक्शनच्यावतीने सांगण्यात आलेय.