साऊथ सुपरस्टारने नशेत अभिनेत्रीला दिला जोरदार धक्का, इंटरनेटवर संताप

 या व्हिडीओत ते भर कार्यक्रमात एका अभिनेत्रीला धक्का देताना दिसत आहे. यावरुन त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 

नम्रता पाटील | Updated: May 30, 2024, 02:26 PM IST
साऊथ सुपरस्टारने नशेत अभिनेत्रीला दिला जोरदार धक्का, इंटरनेटवर संताप title=

Nandamuri Balakrishna Pushes Actress Anjali Video Viral : तेलुगू सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण हे कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. आता नंदामुरी बालकृष्ण यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते भर कार्यक्रमात एका अभिनेत्रीला धक्का देताना दिसत आहे. यावरुन त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 

नंदामुरी बालकृष्ण हे लवकरच 'गँग्स ऑफ गोदावरी' या चित्रपटात झळकणार आहेत. त्यांच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री अंजलीही यात दिसणार आहेत. नुकतंच या चित्रपटाच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नंदामुरी बालकृष्ण, अंजली, विश्वक सेन आणि नेहा शेट्टी यांसह इतर सहकलाकारही उपस्थित होते.  

कार्यक्रमावेळी नेमकं काय घडलं?

या कार्यक्रमावेळी या चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टला मंचावर बोलवण्यात आले. त्यावेळी त्यांना एका रांगेत उभे राहण्यासाठी सांगण्यात आले. यावेळी त्यांनी अभिनेत्री अंजलीला पुढे जाण्यासाठी सांगत जोरदार धक्का दिला. त्यांच्या धक्क्यामुळे ती पडता पडता वाचली. त्यांचे हे कृत्य पाहून उपस्थित असलेल्या सर्वजण आश्चर्यचकित झाले. मात्र अभिनेत्री अंजलीने हसत हसत यावर दुर्लक्ष केले. तर नंदामुरी यांनीही नंतर मजा मस्ती करत यावर पडदा टाकला. 

नेटकऱ्यांकडून जबरदस्त ट्रोलिंग

तसेच या कार्यक्रमावेळी ते दारु पित असल्याचाही व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्यांनी पाण्याच्या बाटलीच्या मागे, दारुची बॉटल लपवल्याचे दिसत आहे. यामुळे त्यांनी नशेत अंजलीला हा धक्का दिला असल्याचे बोललं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यामुळे अनेक नेटकरी त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत. "सर्वात वाईट माणूस", असे एकाने कमेंट करताना म्हटले आहे. तर एकाने "महिला कलाकार संधी गमवण्याच्या भीतीपोटी असा प्रकार सहन करावा लागतो", असे म्हटले आहे. तर एकाने "ही व्यक्ती अशी कशी वागू शकते", अशी विचारणा केली आहे.  

दरम्यान नंदामुरी आणि अंजली यांच्या या व्हिडीओवर त्या दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अंजली ही तामिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहे. तसेच तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. ती लवकरच 'गँग्स ऑफ गोदावरी' या चित्रपटात झळकणार आहे.